व्हिडीओ: गणपतीपुळ्यात बुडणाऱ्या दांपत्याला जीवरक्षकांनी वाचवले

ganpatipule-life-guards

दुर्गेश आखाडे । रत्नागिरी

पुणे येथून गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आलेले दांपत्य आज बुधवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास गणपतीपुळ्यात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे नवरा-बायको पाण्यात बुडाले. समुद्राच्या लाटांबरोबर ते गटांगळ्या खात असताना जीवरक्षकांनी त्यांना वाचवले.

पुणे जिल्ह्यातील खेड येथून गणेश रघुनाथ मेदनकर (वय ३९) आणि सपना रघुनाथ मेदनकर (वय ३५) हे दांपत्य देवदर्शनासाठी गणपतीपुळ्यात आले. आज बुधवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास गणेश मेदनकर आणि सपना मेदनकर पोहण्यासाठी समुद्राच्या पाण्यात गेले. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेजण बुडू लागले. मेदनकर दांपत्याने मदती करीता आक्रोश सुरू करतात जीवरक्षकांनी समुद्रात उड्या घेत दोघांनीही सुखरूप बाहेर काढले.

ग्रामपंचायतचे जीवरक्षक अनिकेत राजवाडकर, मयुरेश देवरुखकर, आशिष माने, मिलिंद माने, ओंकार गावणकर यांनी मेदनकर दांपत्याला सुखरूप पाण्याच्या बाहेर काढले. त्यांना मोरया वॉटर स्पोर्टस, सानिका वॉटर स्पोर्टस, मोरया किर्ती वॉटर स्पोर्टस आणि देवस्थानचे सुरणापेक्षा यांचे सहकार्य लाभले. सुट्टया असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक गणपतीपुळ्यात येत आहेत अशा वेळी पर्यटकानी समुद्रात पोहताना खबरदारी घ्यावी.