शब्द – साहसाचा आविष्कार!


>> दिलीप जोशी 

[email protected]

दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीच्या सैन्याने युरोपभर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आणि हिटलर बघता बघता एकेक देश गिळंकृत करत सुटला. जगावर सत्ता गाजवणाऱ्या साम्राज्यवादी इंग्लंडचीही यातून सुटका होणं शक्य नव्हतं. त्यामध्ये अखेरीस हिटलरचा विनाश आणि इंग्लंड-अमेरिका-रशिया आदी मित्रराष्ट्रांचा विजय झाला तरी जर्मनीने सगळ्यांच्या कसा नाकी दम आणला होता ते अनेक लढायांमधून जगाला दिसलं. अशा आणीबाणीच्या काळात इंग्लंडचं नेतृत्व चेंबर्लेनसारख्या नेमस्त माणसाकडे होतं. नाझींच्या संभाव्य आक्रमणाला फ्रेंच आधीच घाबरले होते आणि त्यातच इंग्लंड, हिटलरशी लढाई करायची की समझोता या संभ्रमात राहाणं इष्ट नव्हतं.

या कसोटीच्या काळात, ६५ वर्षीय विन्स्टन चर्चिल सर्वानुमते इंग्लंडचे पंतप्रधान म्हणून स्वीकारले गेले. सरंजामी वृत्ती, काहीसा आक्रस्ताळेपणा आणि साम्राज्यातील गांधीजींसारख्या नेत्याबद्दल तुच्छता असे चर्चिलच्या स्वभावातले दुर्गुण होतेच, पण लढवय्या बाणा, इंग्लंडवर विलक्षण प्रेम आणि इंग्लिश भाषेवर प्रभुत्व ही त्यांची जमेची बाजू होती. एकेकाळी युद्ध वार्ताहर आणि सैनिक म्हणूनही त्यांनी साहसी वृत्ती प्रगट केलेली होती. ’ उतारवयात १० मे १९४० रोजी ब्रिटनचे पंतप्रधान झाले.

त्यांच्यापुढे तातडीचं आव्हान होतं ते फ्रान्स, इंग्लंडवर होणारं हिटलरचं संभाव्य आक्रमण थांबवण्याचं. त्यासाठी या अहंकारी वृद्धाने कंबर कसली. तरुणाच्या आवेशात ते पार्लमेन्टमधल्या पहिल्याच भाषणात गरजले ‘आज माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी रक्त, श्रम, अश्रू आणि घाम याशिवाय काहीच नाही. मला विचाराल की तुमचं धोरण काय? तर उत्तर एकच. युद्ध! आणि ध्येय फक्त विजय!’ विन्स्टन चर्चिल यांच्या या शब्दांनी इंग्लंडमध्ये चैतन्याची लाट उसळली. ‘पण फक्त बडबड करून काय होणार?’ असा प्रश्न चर्चिलच्या पाच जणांच्या वॉर कॅबिनेटमध्येही कुजबूजला जात होता. हिटलरशी तहाची बोलणी करावीत असा अनेकांचा सूर होता. चर्चिल मात्र आपल्या लढण्याच्या निर्णयापासून मागे हटायला तयार नव्हते. नेदरलॅण्ड (हॉलंड) जिंकून हिटलर फ्रान्सकडे वळत होता. त्याला तिथेच गुंतवून ठेवण्यासाठी फ्रान्सने बेल्जियमची आघाडी उघडली. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. जर्मन सैन्य पॅरिसच्या दिशेने कूच करणार अशी भीती खुद्द फ्रेंच सरकारला वाटत होती आणि भर युद्धात त्यांना या भीतीपासून मुक्त करण्यासाठी चर्चिल थेट पॅरिसला वारंवार जात होते. त्याचा परिणाम मात्र शून्य होता. फ्रान्समधील डंकर्क येथे दोस्त राष्ट्रांची ३,३८,२२० सैनिकांची फौज अडकून पडली होती.

ब्रिटन आणि फ्रान्समधल्या खाडीतून (ब्रिटिश चॅनल) त्यांना ब्रिटनमधे आणणं हा एकमेव पण अत्यंत धोक्याचा उपाय होता, कारण तोपर्यंत नाझी सैन्य अवघ्या तीस-चाळीस किलोमीटरवर आलं होतं. इंग्लंडमध्ये न भूतो अशी घालमेल प्रत्येक जण अनुभवत होता. इंग्लंडने युद्धाऐवजी तह करावा म्हणून हिटलरने आक्रमण किंचित काळ थांबवलं होतं. त्या संधीचा फायदा घेत ब्रिटिश सैन्याने २७ मे, जून या काळात फ्रेंच, पोलिश आणि बेल्जियन सैनिकांची सुटका करून त्यांना ब्रिटनमध्ये आणलं. उरलेले सैनिक अर्थातच ब्रिटिश होते. मात्र यासाठी जर्मनाना कॅले येथे लढाईत गुंतवून ठेवण्याचा आदेश चर्चिल यांनी दिला. ते सैनिक प्राणपणाने लढले. केवळ ३० जण वाचले ‘बाकीच्यांच्या बलिदानामुळे आपण डंकर्क राखू शकलो’ असं चर्चिल यांनी पार्लमेन्टमध्ये सद्गदित स्वरात सांगितले. तोपर्यंत लंडनवरही नाझी बॉम्बहल्ले सुरू झाले होते. चर्चिल स्वतः लोकांना धीर देण्यासाठी रस्तोरस्ती फिरत होते. ‘आपण समुद्र किनाऱयावर, समुद्रात दऱ्याडोंगरात आणि अगदी तशीच वेळ आली समुद्रापलीकडच्या साम्राज्यातून लढू पण शरणागती कदापि पत्करणार नाही’ या त्यांच्या उद्गारानी ब्रिटनला कमालीचं स्फुरण आलं. शेवटी चर्चिल विजयी झाले. हिटलरने आत्महत्या केली. ही सर्व कहाणी आता सांगण्याचं कारण म्हणजे ‘द डार्केस्ट अवर’ या डंकर्कच्या लढाईवर आधारित चित्रपटात, चर्चिलचं अप्रतिम काम करणाऱया गॅरी ओल्डमन यांना त्या भूमिकेसाठी मिळालेला ऑस्कर सन्मान ६० वर्षांच्या गॅरीची ओळख तरुण वर्गाला ‘हॅरी पॉटर’ मालिकेतल्या त्याच्या ‘सायरस ब्लॅक’च्या भूमिकेमुळे असेल. १९७९ मध्ये रंगभूमीवर अभिनयाला आरंभ केलेल्या या चतुरस्र अभिनेत्याने पुढे अनेक चित्रपट गाजवले. ‘प्रीक अप युवर इअर्स’मधलं त्याचं काम पाहून, समीक्षक रॉजर एबर्ट यांनी त्याची ‘आताच्या काळातला सर्वोत्तम तरुण अभिनेता’ अशी वाखाणणी केली होती.

‘द डार्केस्ट अवर’मध्ये गॅरी चर्चिलचं व्यक्तिमत्त्व अक्षरशः जगलाय! इतिहासप्रसिद्ध, त्यातही ज्यांची फिल्मसुद्धा उपलब्ध आहे अशी व्यक्तिरेखा तंतोतंत साकारणं हे कठीण काम. आद्यताखोर, आत्मकेंद्री, अरेरावीने बोलणारा, परंतु इंग्लिश भाषेवर प्रभुत्व असल्याने हजरजबाबीपणे विरोधकांना निप्रभ करणारा अमोध वाणीचा वक्ता चर्चिल आणि त्याचवेळी जर्मनीचे लंडनवर हल्ले होत असताना शहरात फिरून जनतेचं मनोधैर्य वाढवणारा आणि युद्धाच्या धुमश्चक्रीत फ्रान्सला जाण्याचं धाडस करणारा चर्चिल अशा या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक छटा आहेत. गॅरी ओल्डमन यांनी त्या इतक्या सहीसही दाखवल्या आहेत की चर्चिल ठाऊक नसणाऱयांना हाच ‘खरा’ चर्चिल वाटावा! एकाच वेळी कठोर आणि भावनाविवश होण्याचे क्षण चर्चिलच्या आयुष्यात आले, पण इंग्लंड हे सर्वस्व मानणाऱया त्या मानी मनाला पराजय मान्य नव्हता. ही भाववस्था गॅरीच्या प्रत्येक हालचालीतून आणि शब्दातून व्यक्त झाली आहे. त्याबद्दल त्याला उत्कृष्ट अभिनयाचं ‘ऑस्कर’ मिळालं ते उचितच घडलं. …खरा पराक्रमी चर्चिल हिंदुस्थानच्या बाबतीत मात्र उदार नव्हता हेही जाता जाता नमूद करायला हवं. स्वतःच्या देशातल्या लोकशाहीविषयी आदर असणाऱया चर्चिलला हिंदुस्थानातली ब्रिटिश साम्राज्यशाही वावगी वाटत नव्हती.