ठाण्यात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट; चार कामगार गंभीर जखमी

कळव्याच्या शिवशक्तीनगर येथील बैठ्या चाळीत स्वयंपाक करताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. या स्फोटात घराचे पत्रे फुटले असून चौघे जण जखमी झाले आहेत. ते त्याच भागात असलेल्या गॅस एजन्सीमधील कामगार असून ते सर्व जण 70 ते 80 टक्के होरपळले आहेत. त्यांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले आहे.

शिवशक्तीनगर परिसरात रणजित सिंग यांच्या मालकीची भारत गॅस एजन्सी आहे. तेथे काम करणाऱ्या कामगारांसाठी त्यांनी त्याच परिसरात बैठ्या चाळीत रूम घेऊन दिली आहे. तळ अधिक 1 मजली असलेल्या रूममध्ये स्वयंपाक सुरू असताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात सत्यम यादव (20), अनुराज सिंग (29), रोहित यादव (20) आणि गणेश गुप्ता (19) हे कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भारत गॅस एजन्सीमधील 11 रिकामे झालेले गॅस सिंलिडर बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी ठेवले. तर प्राथमिक उपचारानंतर जखमी कामगारांना कस्तुरबा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.