भांडूपमध्ये जेम्सच्या गोळ्यांपासून साकारला बाप्पा

सामना ऑनलाईन । मुंबई

गणेशोत्सवात लाडक्या बाप्पाची मोहक मूर्ती ही आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. विघ्नहर्त्या गणरायाला भक्तगण नेहमीच विविध रूपांमध्ये पाहत असतात. विविध पद्धतीची आरास गणेशमंडळ साकारत असतात. गणेशोत्सवामध्ये गणपती बाप्पाच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर भाष्य करत समजोपयोगी संदेश दिला जातो. विविध वस्तूंचा वापर करून बाप्पा साकारण्याकडे अनेकांचा कल असतो. भांडूप पूर्वच्या दातार कॉलनीतील शिवसाई मित्र मंडळाने यंदा जेम्स चॉकलेट गोळ्यांपासून बाप्पाची मूर्ती साकारली आहे.

गणेशमूर्ती तयार करण्यासाठी ३० हजार गोळ्यांचा वापर करण्यात आला असून त्यासाठी १७ ते १८ दिवसांचा कालावधी लागला आहे. शिवसाई मित्र मंडळाचे यंदाचे हे २० वे वर्ष आहे. या मंडळाने ‘बालक पालक’ हि थीम घेऊन आई-वडील आणि मुलांमधला जनरेशन गॅप आणि त्यांच्या नातेसंबंधांवर भाष्य करणारी आरास साकारली आहे. मागील काही वर्षांपासून हे मंडळ इकोफ्रेंडली गणेशमूर्ती तयार करतात.

bhandup-ganpati

शिवसाई मित्र मंडळाने याआधी देखील शेंगदाण्यापासून, कागदापासून, फुलांपासून, गरममसाल्यांपासून, साखरेपासून, कडधान्यांपासून गणपती बाप्पा साकारुन आपलं वेगळेपण जपलं आहे. यंदा ‘बालक पालक’ हा विषय असल्यामुळे या विषयाला अनुसरूनच लहान मुलांना आवडणाऱ्या जेम्स चॉकलेटच्या गोळ्यांपासून लाडका बाप्पा साकारण्यात आला आहे. गणेशोत्सवासोबतच सामाजिक जबाबदारीच भान राखत इतर अनेक सामाजिक उपक्रमांचं आयोजन हे मंडळ करत असत. आरोग्य शिबीर, स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ आंदोलन, गरीब मुलांना मदत यासारखे सामाजिक उपक्रम मंडळ करत असतं.

गणेशोत्सवाच्या काळात लहान मुलांसाठी निरनिराळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात येतं. शिवसाई मित्र मंडळाने याआधी आपल्या देखाव्यांच्या माध्यमातून स्त्री भ्रूण हत्या, वीज वाचवा, झाडे लावा झाडे जगवा, पाणी प्रदूषण टाळा यासारख्या अनेक विषयांद्वारे समाज प्रबोधन केलं आहे. गणपतीची आरास करताना मंडळातील सर्व सदस्य अगदी उत्साहात मदत करतात. प्लास्टिक, थर्माकोल यासारख्या घातक पदार्थांचा वापर टाळून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा असा संदेश मंडळाने सर्वांना दिला आहे. जेम्सच्या या चॉकलेट बाप्पामुळे बच्चेकंपनी खूप खुश झाली आहे.