प्रसिद्धीसाठी नर्सने केली १०६ जणांची हत्या

सामना ऑनलाईन, बर्लिन

डॉक्टरांसोबत काम करणाऱ्या नर्सचाही रुग्णाला जीवदान मिळण्यात मोठा हात असतो, मात्र जर्मनीतील बर्लिन शहरात एका नर्सला १०६ रुग्णांची हत्या केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. यातील २ रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जर्मनीतील २ शहरात एकूण १०६जणांची या नर्सने हत्या केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

नील होएगल असं या ४१ वर्षांच्या नर्सचं नाव आहे. नीलने १९९९ ते २००५ दरम्यान दोन वेगवेगळ्या रुग्णालयात काम केलं होतं. तिला ज्या वेळी अटक करण्यात आली तेव्हा तो ब्रेमेन इथल्या डेल्मेनहोर्स्ट रुग्णालयात काम करत होता. याच वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात पोलिसांनी आणि सरकारी वकीलांनी नीलने ९० हत्या केल्याचं सांगितलं होतं. पोलिसांनी न्यायालयासमोर सादर केलेल्या ताज्या माहितीनुसार हा आकडा १६ ने वाढला असून, ज्या रुग्णांवर दफनविधी झाले आहेत अशा रुग्णांच्या वैद्यकीय तपासणीनंतर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नीलने रुग्णांना अशी इंजेक्शन दिली की ज्यामुळे रुग्णाचं ह्रद कायम करणं बंद व्हायचं. हे रुग्ण मृत्यूमुखी पडल्यानंतर त्यांना पुन्हा जिवंत करून आपण रुग्णांचा जीव वाचवणारे आहोत अशी प्रसिद्धी मिळावी, आपलं कौतुक व्हावं यासाठी त्याने ही धडपड केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. जर नीलवरील सगळ्या हत्यांचे आरोप सिद्ध झाले तर तो दुसऱ्या महायुद्धानंतरचा जर्मनीतील सगळ्यात क्रूर सिरीयल किलर म्हणून ओळखला जाईल.