पँटच्या खिशातून ‘तो’ अजगर पळवत होता आणि…

1

सामना ऑनलाईन । बर्लिन

तस्करीसाठी तस्करांकडून अनेक कृल्प्त्या वापरण्यात येतात. काहीजण शरीरात सोने, अंमली पदार्थ लपवतात. काहीजण कपड्यांमध्ये वस्तू लपवून तस्करीचा प्रयत्न करतात. काहीजण कासव, साप आणि दुर्मिळ प्राणी पक्ष्यांची तस्करी करतात. तस्करीचा असाच एक विचित्र प्रकार जर्मनीतील बर्लिन विमानतळावर उघडकीस आला. एका माणसाने चक्क पँटच्या खिशात अजगराचे पिल्लू ठेवून तो त्याची तस्करी करण्याच्या प्रयत्नात होता. त्याला अटक करण्यात आली आहे.

विमानतळावर सुरक्षा तपासणीतून पुढे गेल्यावर सुरक्षा रक्षकांना त्याच्या खिशात संशयास्पद वस्तू असल्याचे दिसले. त्याच्या खिशात होत असलेली वळवळ त्यांना जाणवली. त्यामुळे त्यांनी पुन्हा तपासणी केली. त्यावेळी त्याच्या पँटच्या खिशात अजगराचे पिल्लू सुरक्षा रक्षकांना आढळून आले. अटक करण्यात आलेला माणूस 43 वर्षांचा असून तो इस्त्रायलला जाणाऱ्या विमानाने प्रवास करणार होता. बर्लिनच्या कस्टम विभागाकडून याबाबतची माहिती देण्यात आली. जप्त करण्यात आलेले अजगराचे पिल्लू 40 सेंटीमीटर लांब आहे. एका कपड्यात गुंडाळून त्याने अजगराचे पिल्लू खिशात ठेवले होते. त्यामुळे सुरक्षा रक्षकांना खिशामध्ये वळवळ जाणवली आणि त्यामुळे तस्कर पकडला गेला.

आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार सापांच्या सर्व प्रजातींना संरक्षण देण्यात आले आहे. सापांची आयात, निर्यात यावर निर्बंध आहेत. सापांच्या आयात आणि निर्यातीवर युरोपियन युनियनचे नियंत्रण असते. अजगराच्या पिल्लाच्या तस्करीच्या प्रयत्नात असणाऱ्या माणसाचे अजगरासह प्रवास करण्याचे कोणतेही पुरावे सादर केले नाही. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आणि सापाला संरक्षण गृहात पाठवण्यात आले आहे.