गुडघेदुखी पळवा!

सामना ऑनलाईन

व्यायामाचा अभाव आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे गुडघेदुखीची समस्या  उद्भवू लागली आहे. अगदी तरुणांपासून उतारवयातील आजी-आजोबाही गुडघा कुरकुरु लागल्याची तक्रार करतात. अशा वेळी बरेच जण पेन किलर घेतात, मात्र काही घरगुती उपायांनी गुडघेदुखी कमी करता येते.

  • गुडघेदुखी आणि सूज कमी होण्यासाठी आईस पॅकने शेकवा. यामुळे वेदना कमी होतील.
  • कापराच्या तेलामुळे सांध्यांवरील ताण कमी होऊन रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. यासाठी कपभर खोबरेल तेलात एक चमचा कापराची पावडर टाका. हे तेल गरम करा. तेल थंड झाल्यावर दिवसातून २ ते ३ वेळा गुडघ्यांना मसाज करा. यामुळे गुडघ्याचे दुखणे कमी होते.
  • दाह कमी करणे हा ओव्याचा गुणधर्म आहे. त्यामुळे गुडघ्यावरील सूज, लालसरपणा कमी होतो. खलबत्त्यामध्ये ओवा पाण्यासोबत वाटा. वाटलेली पेस्ट गुडघ्यांवर लावल्यास दुखणे कमी होते.
  • कोमट एरंडेल तेलाने गुडघ्यांना मसाज करून गरम पाण्याने शेकवायचे. यामुळे आराम मिळतो. या तेलामधील दाहशामक घटक रोगप्रतिकारशक्ती वाढणारे घटक शरीरात निर्माण करतात.
  • हळदीत दाह कमी करण्याचा गुणधर्म नैसर्गिकरित्याच आहे. गुडघ्याच्या वेदना कमी करण्यासाठी चमचाभर पाण्यात हळद घालून तयार केलेली  पेस्ट लावा. दिवसातून दोन वेळा हा उपाय करा.