संपावर त्वरीत तोडगा काढा अन्यथा कंत्राट रद्द

सामना प्रतिनिधी । उरण

येथील एपीएम टर्मिनलमध्ये (मर्क्स) पर्ल फ्रेंटस् सर्व्हीसेसच्या कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱ्या ९९ कामगारांना कामावरून कमी केले आहे. ठेकेदाराच्या निर्णयाविरोधात कामगारांनी २ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. ठेकेदार कंपनीच्या कामगारांच्या बेकायदेशीर संपामुळे कंटेनर हाताळणीचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे एपीएम टर्मीनल व्यवस्थापनाने ठेकेदाराला नोटीस बजावत १२ तासात काम पुर्ववत सुरु न केल्यास ठेकेदारीचे कंत्राटच रद्द करण्याची नोटीस देऊन निर्वाणीचा इशारा दिला आहे.

येथील द्रोणागिरी नोडमध्ये एपीएम (मर्स्क) कंपनीचे कंटेनर टर्मीनल आहे. एपीएम या बहुराष्ट्रीय कंपनीचे बहुतांश कंटेनर हाताळणी आणि इतर कामे ठेकेदारी पध्दतीवर देण्यात आली आहे. पर्ल फ्रेंटस् सर्व्हीसेस या ठेकेदार कंपनीकडे असलेल्या कंत्राटी कामात सुमारे १८७ कामगार काम करीत आहेत. एपीएम कंटेनर टर्मिनलमध्ये कंटेनर हाताळणीचे काम कमी झाले आहे. त्याशिवाय कामगारही असहकाराची भुमिका घेत असल्याने कामाची गती मंदावली आहे. कामगारांच्या असहकार्याच्या भुमिकेमुळे तेच काम कंपनीला दुसऱ्या माथाडी कामगारांकडून करून घ्यावे लागत आहे. त्यामुळे कंपनीच्या आर्थिक उत्पन्नावरही त्याचा विपरित परिणाम जाणवत आहे. त्यामुळे कंपनीने कामगार कपातीचे धोरण अवलंबिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पर्ल फ्रेंट सर्व्हीसेस या ठेकेदारीवर काम करणाऱ्या कंपनीने ९९ कामगारांना कमी केले आहे. त्याविरोधात २ फेब्रुवारीपासून एपीएम टर्मिनलमध्ये ठेकादारीत काम करणाऱ्या कामगारांनी संपाचे हत्यार उगारले आहे.

सहा दिवसांपासून सुरु असलेल्या संपामुळे मात्र एपीएम कंटेनर टर्मिनलचे कंटेनर हाताळणीचे काम ठप्प झाले आहे.
त्यामुळे एपीएम टर्मिनल व्यवस्थापनाने ठेकेदारी पध्दतीवर काम करणाऱ्या कामगारांचा संप बेकायदेशीर ठरवीत ठेकेदार कंपनी पर्ल्स फ्रेंट सर्व्हीसेस कंपनीच्या संचालक अश्रफ यांनाच नोटीस धाडली आहे. कंपनीच्या कामगारांनी बेकायदेशीर सुरु केलेला संप १२ तासात चर्चा करून मागे घ्यावा. अन्यथा पर्ल्स फ्रेंटस् कंपनीचे कंत्राटच रद्द करण्याचा लेखी पत्राव्दारे निर्वाणीचा इशारा एपीएम टर्मीनल (मर्स्क ) व्यवस्थापनाने दिला आहे. मात्र कंपनी व्यवस्थापक, कामगार संघटनेचे पदाधिकारी, पर्ल्स फ्रेंटस् सर्व्हीसेस या ठेकेदारी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी वारंवार भ्रमरध्वणीवर संपर्क साधुनही संपर्क होऊ शकला नाही. परिणामी संप आणि कामगार कपाती बाबतची त्यांची भुमिका समजु शकली नाही.