मराठीला वैभव मिळावे यासाठी प्रयत्न करण्याची गरज – लक्ष्मीकांत देशमुख

सामना प्रतिनिधी । आळंदी

मराठीला अभिजात राजभाषेचा दर्जा मिळावा. माय मराठीला वैभव मिळावे, यासाठी प्रभावी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितले.

ज्ञानेश्वर संस्थान कमेटी, आळंदी नगरपरिषद, वारकरी शिक्षण संस्था यांच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी आळंदीचे विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्रमुख विश्वस्त शिवाजीराव मोहिते होते.

या प्रसंगी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभय टिळक, विश्वस्त विकास ढगे पाटील, आळंदी नगरपरिषद नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर भोसले, माजी अध्यक्ष सुरेश वडगावकर, बबनराव कुऱ्हाडे, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, नगरसेवक सचिन गिलबिले, प्रशांत कुऱ्हाडे, माजी नगरसेवक मृदुल भोसले, शेतकरी बचाव आंदोलनाचे अध्यक्ष गजानन गांडेकर, देवस्थानचे व्यवस्थापक माउली वीर आदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, संतांचे साहित्य मार्गदर्शक आहे. शाळांत पालकांमध्ये इंग्रजी भाषेला प्राधान्य आहे. इंग्रजी ही भाषा शिकावी मात्र याच बरोबर मराठी भाषेला देखील वैभव प्राप्त होण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. मराठी भाषा टिकली पाहिजे. इंग्रजी शिक्षणाला विरोध नाही मात्र मराठी भाषा शिक्षणाला देखील प्राधान्य देण्याची गरज आहे. मराठीची कास धरण्याची गरज व्यक्त केली. भाषा, परंपरा व संस्कृती जपण्याची आवश्यकता आहे. मराठी भाषेला अभिजात मराठीचा दर्जा मिळायलाच हवा.

मराठीला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळावा यासाठी लढा उभारावा लागेल असे माजी विश्वस्त शिवाजीराव मोहिते यांनी सांगितले. मराठी भाषा व संस्कृती जतन करण्यासाठी मराठी स्वच्छ, शुद्ध व स्पष्ट बोलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

आळंदी देवस्थानच्या वतीने विश्वस्त विकास ढगे पाटील, आळंदी नगरपरिषदेचे वतीने नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने अजित वडगावकर, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर आदींनी यावेळी नवनिर्वाचित साहित्य संमेलनाध्यक्ष देशमुख यांचा हृदयस्पर्शी, भक्तिमय वातावरणात हरिनामाच्या गजरात सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक यांनी केले. आभार ढगे पाटील यांनी मानले.