सैतानाला खूश करण्यासाठी ६०० मुलांचे बळी, पादरीच्या गौप्यस्फोटाने खळबळ

सामना ऑनलाईन । आक्रा

आफ्रिकन देश घानामधील एका पादरीने स्थानिक प्रसारमाध्यमांसोबत बोलताना केलेल्या गौप्यस्फोटामुळे खळबळ उडाली आहे. सैतानाला खुश करण्यासाठी पूजा-विधीवेळी ६०० मुलांचा बळी दिल्याचा धक्कादायक दावा पादरीने केला आहे. डेलीमेलने याबाबत वृत्त दिले आहे.

या वृत्तानुसार, सैतानासोबतच आपला जन्म झाल्याचा दावा पादरीने केला आहे. सैतानासमोर बळी देण्यासाठी एका मेडिकल संस्थेमध्ये काम करणाऱ्या समुहाने मुलं दिली होती, असे पादरीने म्हटले आहे. सैतानाची पूजा करणाऱ्या डॉक्टर आणि नर्स यांनी मुलांचे बळी दिले, असा दावा पादरीने केला आहे. पादरीने नाव सध्या समोर आले नसले तरी जवळपास १७ वर्षे आपण सैतानासोबत राहिलो आहे असे पादरीने सांगितले.

पादरीने सांगितले की, मेडिकल जगतामध्ये काम करणाऱ्या या समुहाने तब्बल ६४५ लोकांचा सैतानासमोर बळी दिला आणि यातील जवळपास ६०० लहान मुलं होती. या हत्या कधी आणि कोठे करण्यात आल्या याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. या हत्यांची कबुली दिलेल्या पादरीचे वय सध्य ३० च्या आसपास आहे. तसेच या व्यक्तीने काही पादरींना खोटारडे असे म्हटले आहे. आपल्या अनुयायांना धोका देण्यासाठी हे पादरी सैतानाच्या आत्म्यांचा वापर करतात असा दावा या व्यक्तीने केला आहे.