तोफेच्या सलामीने अंबाबाई मंदिरात घटस्थापना

2

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर

करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला तोफेच्या सलामीने सुरुवात झाली. सलामी होताच साडेतीन शक्तीपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि ऐतिहासिक श्री भवानी मंडपातील श्री तुळजाभवानी मंदिरातही विधिवत घटस्थापना करण्यात आली. करवीरनगरीत घट बसवून, शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाली. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी श्री अंबाबाईची कोल्लूर मुकांबिका देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली.

नवरात्रोत्सच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून मंदिरांची रंगरंगोटी, स्वच्छता, आकर्षक विद्युत रोषणाई तसेच विविध गावांतून पारंपरिक वाद्याच्या गजरात ठिकठिकाणच्या मंदिरांत ज्योती घेऊन जाण्यास झालेली तरुण मंडळांची गर्दी, यामुळे वातावरण अगोदरच नवरात्रोत्सवमय होऊन गेले होते. बुधवार प्रत्यक्षात सकाळी साडेआठच्या सुमारास परंपरेनुसार श्री अंबाबाई मंदिरात तोफेची सलामी होताच, विधिवत पूजनाने मंदिरातील गाभाऱ्यात श्रीपूजक श्रीपाद मुनिश्वर यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. शेजारी ऐतिहासिक भवानी मंडपातील श्री तुळजाभवानी मंदिरातही पहाटे पाचनंतर देवीला अभिषेक करून विधिवत घटस्थापना करण्यात आली, तर दिवसभरात श्री अंबाबाई मंदिरात आरती, पंचामृत अभिषेक आदी धार्मिक विधी करण्यात आले. दुपारी आरतीनंतर देवीची सालंकृत पूजा बांधण्यात आली. सकाळी दहाच्या सुमारास पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांच्या हस्ते देवीची शासकीय पूजा करण्यात आली. रात्री नऊच्या सुमारास देवीच्या पालखीचे पूजन खासदार संभाजीराजे छत्रपती, धनंजय महाडिक, महापौर शोभा बोंदे्र आदींच्या हस्ते करण्यात आले.

अंबाबाईची मुकांबिका रूपात पूजा
कर्नाटकातील उडपी जिल्ह्यातील कोल्लूर गावी मुकांबिका देवीचे मंदिर आहे. शंख, चक्र, वरद आणि अभय मुद्रा धारण केलेली ही देवी आहे. कोल महर्षींच्या तपामुळे प्रसिद्ध झालेल्या कोल्लूर क्षेत्री मुकासुराचा वध करणारी म्हणून कोल्लूर मुकांबिका अशी या देवीची ख्याती आहे. कम्हासुराने घोर तप सुरू केल्यानंतर त्याची वाचा जावी म्हणून सरस्वतीने त्याला मुके केले. त्यामुळे तो मुकासुर झाला. त्याच्या त्रासापासून सुटकेसाठी पराशक्तीचा अवतार होऊन तिने मुकासुराला ठार केले. त्यामुळे देवीला मुकांबिका नाव मिळाले. देवीसमोर स्वर्णरेखांकित शिवलिंग असून ते शिवाचे प्रतीक आहे. ही देवी सिंहवाहिनी असून, कर्नाटक, केरळ, तमीळनाडू येथे देवीचा मोठा भक्तवर्ग आहे. बुधवारची श्री अंबाबाईची कोल्लूरच्या मुकांबिका रूपातील सालंकृत पूजा अनिल गोटखिंडकर, सचिन गोटखिंडकर आणि आशीष गोटखिंडकर यांनी बांधली.