घाटकोपरच्या झुलत्या इमारतीप्रकरणी बिल्डरवर गुन्हा

सामना प्रतिनिधी । मुंबई

घाटकोपर पूर्वेकडील रायगड चौकातील दामाजी सदन या झुलत्या इमारतीप्रकरणी मेसर्स एस. एस. व्ही. रिऍलटर्सविरोधात पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमारत धोकादायक स्थितीत असूनही स्ट्रक्चरल ऑडिट न केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दामाजी सदन ही धोकादायक इमारत मंगळवारी एका बाजूला झुकली. या इमारतीमध्ये ३३ कुटुंबे राहतात. जीवितहानी होण्याचा धोका असल्याने पालिकेच्या अधिकाऱयांनी पोलिसांच्या मदतीने ही इमारत रिकामी केली.मेसर्स एस. एस. व्ही. रिऍलटर्सने ही इमारत मूळ मालकाकडून खरेदी केली होती. पालिकेच्या अधिकाऱयांनी वारंवार नोटिसा पाठवूनही बिल्डरने इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले नाही. त्यामुळे पालिका अधिकाऱयांच्या तक्रारीवरून बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.