घोडगे सोनवडे घाट मार्गाचे काम एकत्रित प्रयत्नांमुळे झाले शक्य -खा.विनायक राऊत

6

सामना प्रतिनिधी । कुडाळ 

गेली 35 वर्षे रखडलेला घोडगे – सोनवडे घाटाचे काम  कधी होणार  याची प्रतीक्षा सर्वांनाच  होती.या घाटासाठी पर्यावरण वनविभाग वन्यजीव विभागाच्या  मंजुरी साठी पुऱ्या देशाला वळसा घालावा लागला. घाट रस्त्यासाठी आ.वैभव नाईक, आ.प्रकाश आंबिटकर यांनी चांगली साथ दिली तर बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी या घाट रस्ता कामाबाबत चांगली आत्मीयता दाखवली आणि म्हणूनच 3 वर्षातच हा प्रश्न मार्गी लागला. एकत्रित प्रयत्नांमुळे हे शक्य झाले. लवकरच या घाटाचे काम पूर्णत्वास जाईल. आम्ही एखादे काम करायचं ठरवलं की ते पूर्ण करणारच नुसती घोषणा करून कामे पूर्ण  होत  नाहीत ती सत्यात उतरवावी लागतात.त्यामुळे टीका करणाऱ्यांनी फक्त टीकाचं करावी असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले.

सिंधुदुर्ग-कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा  घोडगे-सोनवडे घाट रस्त्याच्या वर्कींग परमीशन कामाचा शुभांरभ खा.विनायक राऊत यांच्या हस्ते रविवारी घोडगे-सोनवडे घाटाच्या पायथ्याशी संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते.

आमदार वैभव नाईक म्हणाले,  गेली कित्येक वर्षे रखडलेल्या सोनवडे घाट मार्गाचे प्रत्यक्षात काम सुरू झाले आहे.या घाटमार्गासाठी  खा.विनायक राऊत यांच्या माध्यमातून  सातत्याने आम्ही शासन स्तरावर  पाठपुरावा केला.यामुळे आमच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे देखील  सहकार्य लाभले. अलीकडेच या  घाटरस्त्यासाठी बजेट मध्ये 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे चंद्रकांत दादा पाटील यांनी या घाटमार्गाकडे येणाऱ्या रस्त्याकरीता बजेटमध्ये 5 कोटी रूपयाची तरतूद केली असून लवकरच हा घाट मार्ग पूर्ण होणार आहे. आता या घाटमार्गामुळे सिंधुदुर्गचा कायापालट होणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आ.प्रकाश आंबिटकर म्हणाले,  घोडगे सोनवडे घाट रस्त्याला अखेर न्याय मिळाला आहे. कोल्हापूरचा प्रत्येक माणूस याघाट रस्त्यामुळे कोकणला  जोडला जाणार आहे. पाटील आणि खा.राऊत यांचे या मार्गासाठी मोलाचे सहकार्य लाभले याबद्दल खासदार राऊत यांचे आभार मानायला मी येथे आलो आहे. या घाटमार्गाच्या कामाच्या शुभारंभामुळे आपली 25 वर्षांची प्रतिक्षा संपल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी  काढले.

याप्रसंगी व्यासपीठावर कुडाळ  सभापती राजन जाधव, गटनेते नागेंद्र परब, संजय पडते, अमरसेन सावंत, उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, तालुका प्रमुख राजन नाईक, प.स.सदस्य शितल कल्याणकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.