गिरीजादेवी

>>प्रशांत गौतम<<

ठुमरी हा गायन प्रकार सर्वसामान्य रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी मोठे योगदान दिले त्यात प्रख्यात ठुमरी गायिका गिरीजादेवी यांचा अग्रक्रम लागतो. शास्त्रीय संगीतासोबतच उपशास्त्रीय संगीताला त्यांनी आपल्या स्वरातून दर्दी रसिकांपर्यंत पोहचवले होते. आपा या नावाने परिचित असलेल्या गिरीजादेवी यांचा जन्म ८ मे १९२९ रोजी बनारस येथे झाला. त्यांचे वडील उत्तम हार्मोनियमवादक असल्याने संगीताचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले.  वडिलांनी गिरीजादेवींना संगीत शिक्षणासोबतच अनेक भाषा आणि मर्दानी खेळही शिकवले. पंडित सरयूप्रसाद मिश्र हे त्यांचे गुरू. पं. श्रीचंद मिश्रा यांच्याकडे प्राथमिक धडे गिरवल्यानंतर वयाच्या पाचव्या वर्षापासूनच गिरीजादेवींनी गायक व सारंगी वादनाचे शिक्षण ज्येष्ठ कलाकार सरजुप्रसाद मिश्र यांच्याकडून  घेतले. वयाच्या ९ व्या वर्षी त्यांना एका चित्रपटात भूमिका करण्याची संधी मिळाली. १९४९ साली गिरीजादेवींनी अलाहाबाद आकाशवाणी केंद्रावरून सर्वप्रथम गायनाचे सादरीकरण केले. गिरीजादेवींना घरात वडिलांचे प्रोत्साहन होते. मात्र आई आणि आजी यांचा विरोध होता. कारण त्या दोघींच्या समजुतीनुसार उच्चवर्णीय स्त्र्ाया या सार्वजनिक कार्यक्रमात गायन करीत नसत आणि गिरीजादेवींचे घराणे तर खानदानी होते. अशा परिस्थितीशी संघर्ष करीत त्यांनी आपला संगीत प्रवास सुरूच ठेवला. गिरीजादेवी ठुमरीसोबतच धृपद, ख्याल, टप्पा ठुमरी, दादरा, चती, कजरी, होरी, सावनी, झुला असे विविध गायन प्रकार मैफलीत सादर करून रंग भरत असत. त्यांच्या गायनात पारंपरिकता असली तरी त्यास पुरबी अंगाची एक छटा लाभली होती. मैफलीचा प्रारंभ त्या ख्याल गायनाने करीत. स्वरांवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. अनुनासिक, किनरा आवाज यामुळे रसिक भारावून जात. संगीत शिक्षण, प्रसार आणि मैफलीसाठी त्यांनी देशभरात प्रवास केला. १९५१ साली आरह (बिहार) येथे गायनाची पहिली मैफल झाली. १९९० च्या सुमारास बनारसच्या हिंदू विद्यापीठात अध्यापनाचे कार्य केले. गिरीजादेवींच्या मैफली रंगण्याचे एक गुपित त्यांनीच एका मुलाखतीत सांगितले होते. मैफल सुरू करण्यापूर्वी बनारसचे पान खाल्ले की गळा फुलून येतो, असे त्या म्हणत. बनारस घराण्याच्या गायिका असणाऱ्या गिरीजादेवींची लोकसंगीत आणि उपशास्त्रीय गायन प्रकारांवर हुकुमत होती. सुरेलता ही उच्च दर्जाची होती. त्या बनारसी परंपरेत गात आणि त्याच परंपरेतून पुरबी अंग शैलीतून ठुमरीचे सादरीकरण करीत. आवाजातील विविध चढउतार तेही लोकसंगीतातून असे फार कमी जणांच्या बाबतीत सूर जुळून येत असतात. त्यांच्या ठुमरीची लय संथ होती. एवढेच नव्हे तर माफक हरकती, भरपूर कल्पनाविलास यांचे संयमित भावदर्शन ठुमरी सादरीकरणातून होत असे. पं. सामता प्रसाद, किशन महाराज, उस्ताद अल्लारखाँ, झाकीर हुसेन अशा कसलेल्या दिग्गज तबलजींसोबत गिरीजादेवींनी मैफल लोकप्रिय केल्या. कोलकाता येथे संगीत रिसर्च अकादमीत दोन वेळा गुरू म्हणून नियुक्त झाल्या होत्या. पद्मश्री, पद्मविभूषण या नागरी सन्मानांसह द न्यू ग्रोव्ह ऑफ म्युझिक या पुरस्काराने त्यांचा गौरव झाला होता. गुजरात सरकारचा ताना रीरी पुरस्कार, संगीत नाटक अकादमी,  तानसेन सन्मान,  डोव्हर लेन म्युझिक पुरस्कार, दिल्ली सरकारचा जीवनगौरव अशा सन्मानांनी गिरीजादेवी सन्मानित झाल्या होत्या. वयाच्या ५व्या वर्षी सुरू झालेला हा संगीत प्रवास बुधवारी ८८ व्या वर्षी कायमचा थांबला आणि संगीत क्षेत्रातील ठुमरी पर्व अस्ताला गेले.