आंघोळीदरम्यान मोबाईल वापरणे बेतले जीवावर

सामना ऑनलाईन । मेक्सिको

जगभरात आता कोट्यवधी नागरिक स्मार्टफोन वापरतात. अन्न, वस्त्र आणि निवारा या ३ मुलभूत गरजांमध्ये आता मोबाईल ही चौथी मूलभूत गरज सामील झाला आहे. लोकांना आज उठता-बसता, खात-पिता, झोपतानाही मोबाईल वापरण्याची सवय लागली आहे. मात्र मोबाईलचा अतिरेकी वापर किती धोकादायक आहे याचा प्रत्यत न्यू मेक्सिकोमध्ये घडलेल्या एका घटनेवरुन येऊ शकतो.

न्यू मेक्सिकोमध्ये राहणाऱ्या एका १४ वर्षांच्या मुलीला आंघोळीदरम्यान मोबाईलचा वापर करणे जीवावर बेतले आहे. मॅडिसन कोएवॉस असे मृत मुलीचे नाव आहे. आंघोळीदरम्यान चार्जिंगला लावलेला मोबाईल बाथटबमध्ये पडला. बाथटबमध्ये पडलेल्या मोबाईलला हात लावल्याने मॅडीसनचा मृत्यू झाल्याचे कुटुंबियांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासामध्ये मॅडिसनचा मृत्यू वीजेचा झटका लागल्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच मॅडिसनच्या हातावर जळाल्याचीही खूण दिसून आली आहे. मॅडिसनच्या आईने आपल्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत मुलांना अशा घटनांपासून दूर राहण्याची विनंती केली आहे.