शोले स्टाईल ऑनलाईन गेमने घेतला तरुणीचा बळी

सामना ऑनलाईन । ग्वालेर

ब्लू व्हेल, मोमो या जीवघेण्या ऑनलाईन गेमनंतर आता शोले स्टाईल ‘रुसी रुले’ या खेळाच्या वेडाने ग्वाल्हेरच्या 21 वर्षीय तरुणीने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मध्यप्रदेशात घडली आहे. करिष्मा यादव असे आत्महत्याग्रस्त युवतीचे नाव असून तिचे वडील निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. करिष्माला बंदुकीने खरलेल्या जाणाऱ्या या गेमचे प्रचंड वेड होते.

करिष्मा तिच्या दिल्लीतील मित्रांसोबत व्हाट्सअपवार व्हिडीओ कॉलवर गप्पा मारत होती. तर दुसरीकडे ऑनलाईन ‘रुसी रुले’ गेम खेळत होती.मित्रांशी गप्पा मारताना करिष्माने आपल्याजवळ असलेली बंदूक मित्रांना दाखवली. त्यानंतर बंदुकीत एकच गॊळी टाकून बंदुकीचे चेंबर फिरवले. बघूया, आज कोणाचे नशीब जोरावर आहे, असे म्हणत तिने बंदूक चालवली आणि दुर्दैवाने गॊळी लागून तिचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाला.

काय आहे ‘रुसी रुले’ गेम ?
शोले चित्रपटात गब्बर कालियाच्या डोक्यावर बंदूक ठेवून आदमी तीन, गोलिया दो, असे म्हणून रायफलचा चेम्बर फिरवत म्हणतो, अब कहा है गोली, कहा नही मुझे कूच नही पता. त्यानंतर त्याने ट्रिगर दाबताच वार फुकट जाऊन कालिया वाचतो. तश्याच प्रकारच्या नशिबाची जीवघेणी परीक्षा घेणाऱ्या “रुसी रुले” या बंदुकीच्या भयानक ऑनलाईन खेळाने देशभरात युवकांना वेड लावले आहे. करिष्मालाही या खेळाने वेडे करून टाकले होते. मोमो आणि ब्लू व्हेलप्रमाणेच ‘रुसी रुले’ खेळातही बंदुकीत फक्त एकच गॊळी ठेऊन बंदूक स्वतःच्या डोक्यावर ठेऊन चालवण्याचा टास्क खेळाडूला दिला जातो. ट्रिगर दाबल्यानंतर गॊळी चालली नही तर खेळाडू नशीबवान ठरतो.