पस्तीस वेळा प्रेमास नकार देणाऱ्या तरुणीच्या पोटात ‘त्याने’ केले पस्तीस वार

1

सामना ऑनलाईन। सोमनाथ

गुजरातमधील सोमनाथ जिल्हयात एकतर्फी प्रेमातून माथेफिरू तरुणाने 16 वर्षीय तरुणीच्या पोटात धारदार शस्त्राने 35 वार करून तिला ठार केल्याची भयंकर घटना घडली आहे. तरुणीने त्याला 35 वेळा नकार दिला होता. यामुळे रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे विनिशा ठक्कर (16) असे तिचे नाव आहे तर कश्यप पुरोहीत (20) असे आरोपीचे नाव आहे.

विनिशा येथील अंबुजा शाळेत शिकत होती. तसेच कश्यपही त्याच शाळेचा विद्यार्थी होता. पण बारावीनंतर त्याने शिक्षण सोडून दिले होते. पण तरीही तो वरचेवर शाळेत यायचा व विनिशाचा पाठलाग करायचा. त्याचे विनिशावर एकतर्फी प्रेम होते. पण विनिशा त्याला सतत नकार देत होती. कश्यपचे वडील पुजारी होते. त्यामुळे पूजेच्या निमित्ताने ते विनिशाच्या घरी पूजा करायला जात असतं. त्यातच कश्यपच्या घराशेजारीच विनिशाचे काका राहतात. त्यामुळे दोन्ही कुटुंब एकमेकांना ओळखत होते. कश्यपचेही विनिशाच्या घरी येणे जाणे होते. यामुळे तो बऱ्याचवेळा कामाच्या निमित्ताने विनिशाबरोबर जवळीक करू पाहायचा. पण विनिशाकडून त्याला सतत नकार मिळत होता. गेल्या सहा महिन्यात त्याने तिला ३५ वेळा प्रपोज केले होते पण प्रत्येकवेळी विनिशाने त्याला धुडकावून लावले होते. यामुळे कश्यप चवताळला होता. त्याने सोमवारी विनिशाच्या मैत्रीणीची मदत घेत तिला शिव मंदिराजवळ भेटण्यास बोलावले. मैत्रिणीने बोलावल्यामुळे विनिशाला जराही संशय आला नाही व ती भेटण्यास गेली. पण तिथे कश्यपला बघताच तिने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. हे बघताच कश्यपने खिशातून धारदार सुरा काढला व विनिशाचा पाठलाग करत तिच्या पोटात पस्तीस वार केले. त्यानंतर तो तिथून पळून गेला.

दरम्यान, विनिशा घरी न परतल्याने घरातल्यांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली.अखेर विनिशाच्या वडिलांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली. त्यानंतर संध्याकाळी विनिशाचा मृतदेह पोलिसांना शिव मंदिराजवळ सापडला. विनिशाच्या वडिलांनी कश्यप तिला त्रास देत असल्याचे पोलिसांना सांगितले. यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर कश्यपने विनिशाची हत्या केल्याची कबुली दिली.