नको तिथे स्पर्शाला विरोध, कंडक्टरने तरुणीला चालत्या बसमधून ढकलले

सामना ऑनलाईन । कोलकाता

कोलकातामध्ये एका खासगी बसमधून प्रवास करताना कंडक्टरने तरुणीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. ही खाजगी बस प्रवाशांनी खच्चून भरली होती. तेव्हा कंडक्टर या तरुणीला सारखा पुढे जा म्हणत ढकलत होता. तिने जेव्हा त्याला विरोध केला तेव्हा कंडक्टरने तिला जोरदार धक्का दिला आणि तरुणी चालत्या बसमधून खाली पडली. धावत्या बसमधून खाली पडल्याने या विद्यार्थिनीच्या पायाचा अंगठा तुटला आहे.

दिशा मालखंडी आणि तिची मैत्रीण शुक्रवारी दुपारी 2.30 च्या सुमारास कॉलेजला जात होत्या. तेव्हा एका खाजगी बसमध्ये त्या चढल्या. या बसमध्ये इतकी गर्दी होती की तिथे उभे रहायलाही जागा नव्हती. तेव्हा बसचा कंडक्टर सारखा पुढे जा पुढे जा म्हणत दिशाला ढकलत होता. यावेळी त्याने दिशाला वाईट हेतूने स्पर्श केला. यावर दिशा चिडली आणि तिने कंटक्टरला खडसावलं. यामुळे भडकलेल्या कंडक्टरने तिलाजोरात धक्का दिला त्यामुळे दिशा बसबाहेर फेकली गेली. दिशा खाली पडल्याचं दिसल्याने तिच्या मैत्रिणींनी आरडाओरडा केला आणि बसचालकाला बस थांबवायला सांगितली. मात्र तरीही बसचालकाने बस थांबवली नाही असं दिशाच्या मैत्रिणीने सांगितलं आहे. पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज मागवले असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.