प्रेयसीची हत्या करून पळालेला दिल्लीत सापडला

2

सामना ऑनलाईन । मुंबई

गेली चारहून अधिक वर्षे सोबत राहणाऱ्या प्रेयसीची हत्या करून पसार झालेल्या आरोपीला वडाळा टी.टी. पोलिसांनी अखेर पकडले. पोलिसांना चकवा देत विविध ठिकाणी लपून राहणाऱ्या फझलू रेहमान कुरेशी ऊर्फ कप्तान कुरेशी याला पोलिसांनी दिल्लीमध्ये पाठलाग करून पकडले.

विवाहित असलेला फझलू गेल्या अनेक महिन्यांपासून रिता जैस्वार हिच्यासोबत ऍण्टॉप हिल परिसरात राहत होता. दोघे पती-पत्नीप्रमाणे संसार करीत होते. दरम्यान, काही कौटुंबिक कारणातून 20 एप्रिलच्या सकाळी फझलूने रिताची हत्या केली आणि तेथून पळ काढला. हा प्रकार कळताच वडाळा टी.टी. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हत्येचा गुन्हा दाखल केला आणि फझलूचा शोध सुरू केला. तपासादरम्यान फझलू विवाहित असून त्याला पहिली पत्नी व मुले आहेत. तसेच तो हत्या करून विक्रोळी, कौसा, मुंब्रा आदी ठिकाणी लपून राहत असल्याची खबर पोलिसांना मिळत होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सांगळे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, उपनिरीक्षक बिराजदार तसेच तांबडे व जावीर हे पथक फझलूची माहिती मिळेल तसे त्या ठिकाणी जात होते, पण फझलू पोलीस येण्याआधीच तेथून पसार व्हायचा. दरम्यान, फझलू त्याच्या यूपीतल्या गावी पळून गेल्याचे कळताच पोलीस तेथेही धडकले, पण तेथूनही तो सटकला. त्यानंतर तो दिल्लीत असल्याचे कळताच पथक दिल्लीत गेले. अखेर त्याला चांदबाग, भजनपुरा येथे सापळा रचून पकडले.