लेकींची सुरक्षा

डॉ. विजया वाड

आबा आणि माई रोज वेगवेगळय़ा रस्त्यावर सायंकाळी पाच ते आठ फिरत असतात. आबा साठीचे नि माई अठ्ठावन्नच्या. माई मुख्याध्यापक म्हणून एप्रिल २०१७ ला निवृत्त झाल्या आणि आबा प्राध्यापक म्हणून जानेवारी २०१७ ला मुक्त झाले. दोघांचा तारुण्याशी निकट सहवास. दोघांना समाजसेवेची आवड. हे जोडपे जसे काही समाजासाठीच जन्मले. मूल नाही झाले, पण कधीही रडकथा गायली नाही. आपले विद्यार्थी आपली मुलेच! अशी माया ममता दिली. त्यामुळे कधी एकटं वाटलंच नाही. सतत विद्यार्थ्यांचा राबता आहेच घरी-दारी शिवाय दोघं ई-मेल, फेसबुक, व्हॉट्सऍपशी फ्रेंडली असल्याने दिवसाचे चोवीस तास त्यांना अपुरे पडतात.

आबा नि माई रोज वेगवेगळय़ा रस्त्यांवर सायंकाळी पाच ते आठ काय करतात? ते स्वतःस स्वघोषित तटरक्षक म्हणतात. माई आणि आबां जवळ एक पिशवी बाळगतात, त्यात एकेक लाटणं नि एकेक ‘सोटा’ असतो. काय झालंय, पोरी टोरी क्लासला जातात नि साडेसातपासून कल्ला हो. घरी परतायची घाई. त्या समूहाने गेल्या तर ठीक हो! पण एरवी? रोड साईड रोमिओंचं आव्हान जब्बरदस्त ना? मग कोणी अचकट विचकट कॉमेंट पास केलीच तर मग सटकन माईंचा काय आबांचाही हात पिशवीकडे जातो. लाटणे निघते. भित्रट मवालीपण शून्य मनोधैर्याचे असतात. घाबरतात नि पळून जातात, पण काही निब्बर माणसं असतात बनचुकी. ती घेतात की फिरकी. लावतात आवाजाचा भोंगा! ‘‘काय गं थेरडे? हातात आहे का जोर? लाटणी काढत्येय!’’ मग? राजेहो, अशा वेळी पिशवीला आसूड बाहेर पडतो. ‘‘अरे सोद्या, थांब दाखवते तुला माझी ताकद.’’ माई आवाज लावतात. माईकच हो! ‘‘आता तुझा बंदोबस्त करतो बघ.’’ आबा आवाजाचा कर्णा लावतात. गुंड मवाली म्हाताऱयांचा हा अनपेक्षित अवतार बघून सटपटतात. सामर्थ्याचा वेगळा आविष्कार. अहो दोन सप्पासप्प सोटय़ांचा प्रसाद मिळताच गुंड वठणीवर येतात…‘बघे’सुद्धा मग कार्यरत होतात. ज्येष्ठांना साथ देतात. समाजातली स्वकेंद्री, बघी, आत्मरत वर्तुळे फोडून जास्तीत जास्त तटरक्षक निर्माण व्हावेत ही आबा नि माईंची इच्छा आहे. आपणास वाटते का? सामील व्हावे? मग या तटरक्षक दलात स्वागत आहे.