विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी युवासेनेची विद्यापीठावर धडक

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई विद्यापीठात नुकतीच दिवसाढवळ्या विनयभंगाची घटना घडली होती. याची गंभीर दखल घेत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठावर धडक देत याप्रकरणी प्र-कुलगुरू आणि कुलसचिव यांना जाब विचारला. अखेर युवासेनेच्या दणक्यानंतर आता कलीना कॅम्पसमध्ये पोलीस चौकी उभारण्यात येणार आहे.

कलीना कॅम्पस रानडे भवन येथे एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना घडली होती. या प्रकाराची गंभीर दखल घेत युवासेनेच्या महिला सिनेट सदस्यांनी या मुलीला सोबत घेऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तसेच विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्याच्या सुरक्षेच्या मुद्दय़ावर प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी आणि कुलसचिव दिनेश कांबळे यांना जाब विचारात कारवाई करण्यास भाग पाडले. त्यानुसार कलीना कॅम्पसमध्ये सीसीटीव्ही बसवणे, युवासेवा फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थिनींसाठी सेल्फ डिफेन्सचा कार्यक्रम राबवणे, वुमन डेव्हलपमेंट सेलमध्ये महिला पदवीधर सिनेट सदस्यांनी नेमणूक करणे तसेच विद्यापीठ कायद्यानुसार  विद्यार्थी, कर्मचारी  यांच्या तक्रारी आणि समस्यांबाबत अंतर्गत चौकशी समिती कार्यरत करून त्यात सिनेट सदस्यांना सहभागी वरून घेणे आदी उपाययोजना करण्याचे यावेळी आश्वासन युवासेनेच्या शिष्टमंडळाला देण्यात आले.

यावेळी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेवर, प्रवीण पाटवर, सुप्रिया वरंडे, शीतल शेठ-देवरुखवर, शशिकांत झोरे, वैभव थोरात आदी उपस्थित होते.