पालिका कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस द्या! कामगार कृती समितीने दिला अल्टिमेटम

सामना प्रतिनिधी, मुंबई

पालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ४० कर्मचारी संघटनांनी आज एकत्र येऊन पालिका मुख्यालयावर धडक दिली. कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस द्या या प्रमुख मागणीसाठी आज कामगार संघटनांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांना मागण्यांचे निवेदन दिले आणि बोनसबाबत निर्णय घेण्यासाठी ९ ऑक्टोबरचा अल्टिमेटम दिला. ९ ऑक्टोबरपर्यंत बोनसबाबत निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कामगार कृती समितीच्या वतीने देण्यात आला.

पालिका प्रशासनानच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात आवाज उठवण्यासाठी पालिका कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या तब्बल ४० संघटनांनी एकत्र येऊन कामगार कृती समिती स्थापन केली असून या समितीने आज लक्षवेधी मोर्चा मुख्यालयावर आणला होता. आपली डय़ुटी संपवून सुमारे १० ते १५ हजार कर्मचारी आझाद मैदानात जमले होते. कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त अजोय मेहता आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची भेट घेतली व त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन पुढील दिशा जाहीर केली. यावेळी महाबळ शेट्टी, प्रकाश देवदास, कामगार सेनेचे बाबा कदम, सत्यवान जावकर, अभियंता संघटनेचे साईनाथ राजाध्यक्ष आदी नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालिका प्रशासनाने बायोमेट्रिक पद्धत आणून ती पगाराशी जोडल्यामुळे अनेक कर्मचारी आजच्या मोर्चाला येऊ शकले नाही.

महापौर घेणार गटनेत्यांची बैठक
शिष्टमंडळाने आज महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांचीही भेट घेतली. कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत येत्या शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी गटनेत्यांच्या बैठकीत बोनसबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन महापौरांनी शिष्टमंडळाला दिल्याची माहिती बाबा कदम यांनी दिली. या निर्णयप्रक्रियेत कामगारांच्या प्रतिनिधींना सहभागी करून घ्यावे, अशी मागणीही समितीने केली असल्याचे त्यांनी सागितले.

अन्य मागण्यांसाठी समन्वय समिती
बायोमेट्रिक यंत्रणेतील त्रुटी दूर करा, पगारवाढ आणि भत्ते सुधारा, वैद्यकीय गटविमा योजना पुन्हा सुरू करा, कंत्राटीकरण आणि खासगीकरण थांबवा अशा विविध मागण्यांसाठी प्रशासनाकडून समन्वय समिती स्थापन केली जाईल व कामगार प्रतिनिधींशी चर्चा करून समस्या सोडवल्या जातील, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती प्रकाश देवदास यांनी दिली.

  • का हवा बोनस
  • पालिकेतील कामगार कर्मचारी अधिकाऱ्यांची पदे : १ लाख ५३ हजार
  • प्रत्यक्षात कर्मचारी अधिकाऱ्यांची संख्या : १ लाख ३ हजार ५५२
  • रिक्त पदे : ४९, ४४५
  • रिक्त पदांमुळे दरमहा वाचणारी रक्कम : १४५ कोटी ३४ लाख ४० हजार
  • रिक्त पदांमुळे पालिकेचे दर महिना दीडशे कोटी वाचतात व या रिक्त पदांचे काम अन्य कर्मचाऱ्यांना करावे लागते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना बोनस द्यावा अशी मागणी कृती समितीने केली आहे.