लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ द्या!

सामना प्रतिनिधी, मुंबई

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अवघा महाराष्ट्र पिंजून काढत जनजागृती करणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्या या मागणीसाठी अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबीयांनी आझाद मैदानात साखळी उपोषण सुरू केले आहे. अण्णाभाऊंचे राष्ट्रीय स्मारक उभारा आणि मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे अमूल्य योगदान आहे. याची शासनाने दखल घेऊन त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा आणि प्रलंबित मागण्यांसाठी अण्णाभाऊ साठे यांची सून सावित्रीबाई मधुकर साठे, सचिन संजय साठे (नातू), जाईबाई साठे-भगत (अण्णांची बहीण), गणेश रमेश भगत (नातू), सुवर्णा मधुकर साठे (नात), ज्योती साठे-भगत (नात) यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण १८ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.