कसोटी संघात अश्विन, कुलदीप दोघांनाही संधी द्या!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंग्लंडमध्ये चालू हंगामात या काळात तेथील खेळपट्ट्या कोरड्या होतात. त्यामुळे टीम इंडियाने ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि डावखुरा फिरकीवीर कुलदीप यादव या दोघांनाही कसोटीच्या अंतिम संघात स्थान द्यावे, अशी मागणी हिंदुस्थानचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याने केली आहे. यंदा बर्मिंगहॅम कसोटीने हिंदुस्थान-इंग्लंड कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. इंग्लंडला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याची सुवर्णसंधी यंदा टीम इंडियाला आहे असाही दावा अझरने प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केला. १९८६ मध्ये इंग्लंडला त्यांच्याच भूमीत पराभूत करणाऱ्या हिंदुस्थानी संघात अझरचा समावेश होता.

हिरवीगार खेळपट्टीच इंग्लंडला तारू शकेल
यजमान इंग्लंड संघाला हिरवीगार खेळपट्टीच तारू शकेल. कारण कोरडय़ा गवत नसलेल्या खेळपट्टीवर हिंदुस्थानी फिरकी गोलंदाज अश्विन आणि कुलदीप त्यांना त्रासदायक ठरू शकतील. खेळपट्टी कोरडी असेल तर टीम इंडियाने ३ वेगवान आणि २ फिरकी गोलंदाज घेऊन खेळावे. खेळपट्टी हिरवी असले तर मात्र ४ वेगवान गोलंदाज आणि १ फिरकीपटू असे संघाचे कॉम्बिनेशन ठेवावे असेही प्रतिपादन अझरुद्दीनने केले. इंग्लंडकडे सध्या जेम्स ऍण्डरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड हे दोनच बलवान वेगवान गोलंदाज आहेत. पण दुखापतीमुळे त्यांचा फारसा प्रभाव पडेल असे वाटत नाही, असेही अझरने स्पष्ट केले.

रिषभकडे अफलातून खेळाची क्षमता – द्रविड
युवा यष्टिरक्षक रिषभ पंतकडे कोणत्याही फॉरमॅटमध्ये फलंदाजी करण्याची अफलातून क्षमता आहे. त्यामुळे तो कसोटीतही उत्तम प्रदर्शन करू शकतो, अशा शब्दांत हिंदुस्थानचा माजी कर्णधार राहुल द्रविड याने पंत याच्या संघातील समावेशासाठी आग्रह व्यक्त केला आहे.