संकेत कुलकर्णीच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा

6

सामना ऑनलाईन, संभाजीनगर

  • ‘अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी ज्यांनी हा निर्दयपणा उघड्या डोळ्यांनी पाहिला त्यांनी समोर यावे..’
  • ‘एकाला दोन मदतीला धावले असते तर संकेतचा जीव वाचला असता…’

आठवडाभरापूर्वी ज्या कामगार चौकात माणुसकी थिजली होती तेथेच आज शोकसभेच्या निमित्ताने समाजाच्या मनातील खदखद बाहेर पडत होती. गेल्या आठवड्यात एकतर्फी प्रेमातून संकेत जायभाये याने संकेत कुलकर्णी याची कामगार चौकात अतिशय निर्दयपणे कारखाली चिरडून हत्या केली होती. ही घटना घडत असताना अनेकजण मोबाइल शूट करण्यात व्यस्त होते. संकेतला वाचवण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. त्यादिवशी कामगार चौकात माणुसकीही कारखाली चिरडली गेली. या घटनेचे संतप्त पडसाद उमटले. सोशल मिडियावर संतापाचे उसासे सोडले गेले.

संकेत कुलकर्णी याला श्रद्धांजली वाहण्यासाठी ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच कामगार चौकात आज शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना अनेकांनी संकेत मदतीसाठी याचना करत असताना कोणीही त्याचा जीव वाचवण्यासाठी पुढे आले नाही, उलट काही जण मोबाइलशूट करत होते. ही माणूसकी आहे का? एखाद्याचा जीव जात असताना आपण फोटो काढतो, हे सारे संतापजनक आहे. एकाला दोघे जण धावून गेले असते तर कदाचित संकेतचा जीव वाचला असता अशी खंत अनेकांनी बोलून दाखवली.

जायभायेच्या साथीदारांना पकडा
शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी संकेतला न्याय मिळवून देण्यासाठी संजय कुलकर्णी यांना सोबत घेऊन आपण मुख्यमंत्र्यांना भेटल्याचे सांगितले. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे आणि अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना वकील म्हणून नेमावे ही मागणी मुख्यमंत्र्यांनी तत्वत: मान्य केल्याची माहितीही त्यांनी दिली. संकेत जायभायेचे तीन साथीदार अजून फरार आहेत. आठ दिवसांत त्यांना पकडावे नसता पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला.  यावेळी शिवसेनेचे विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी, आमदार अतुल सावे, आमदार इम्तियाज जलील, माजी महापौर भगवान घडमोडे यांच्यासह स्थानिक नागरिकांची श्रध्दांजलीपर भाषणे झाली. या श्रद्धांजली सभेसाठी परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील नागरिकांसह शहरातील विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने कामगार चौकात आले होते.

अंगावर शहारे येतात
संकेत कुलकर्णीची हत्या होताना पाहिली, घडलेली घटना कल्पने पलीकडची होती. ती घटना आठवली तर आजही अंगावर शहरे येतात, अशी भावना व्यक्त करताना मीरा पाटील म्हणाल्या, हल्लेखोरांना शिक्षा झाल्याशिवाय संकेत कुलकर्णीला न्याय मिळणार नाही, संकेतला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वपरीने प्रयत्न करणाार असल्याचे म्हटले.

संकेतला न्याय द्या
संकेतला शिकण्यासाठी संभाजीनगरला पाठवले होते. एक वर्ष येथे शिकल्यानंतर तो पुण्याला गेला. परीक्षा देऊन घरी येताना मित्राला भेटून येथे असे म्हणाला. घरी परतले ते त्याचे अचेतन शरीर… संकेतचे वडील संजय कुलकर्णी यांच्या डोळ्यात पाणी दाटून आले. माझा संकेत गेला. पण अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी त्यादिवशी ज्यांनी हा निर्दयपणा पाहिला त्यांनी समोर यावे आणि संकेतला न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन संजय कुलकर्णी यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या