गणेशभक्तांना चांगली सेवा द्या, सभापती राजन जाधव यांच्या सुचना

सामना प्रतिनिधी । कुडाळ

गणेशोत्सव काळात सर्वच यंत्रणांनी विशेष लक्ष देऊन गणेशभक्तांना चांगली सेवा द्यावी, कोणाचीही गैरसोय होता नये, याची दक्षता घ्यावी अन्यथा गय केली जाणार नसल्याचा इशारा सभापती राजन जाधव यांनी गणेशोत्सव नियोजन बैठकीत संबंधितांना दिला.

कुडाळ पंचायत समितीच्यावतीने गणेशोत्सव पार्श्‍वभुमीवर नियोजन बैठक सोमवारी सभापती राजन जाधव यांच्या दालनात पार पडली. उपसभापती सौ. श्रेया परब, गटविकास अधिकरी विजय चव्हाण आदींसह सदस्य, विविध विभागांचे खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

सभापती.जाधव यांनी सर्व विभागांकडुन गणेशोत्सव कालावधीतील नियोजनाचा आढावा घेतला सर्व विभागाच्या खाते प्रमुखांनी आपल्या विभागाकडुन केलेल्या नियोजनाची माहिती दिली. आगारव्यवस्थापक सुजीत डोंगरे यांनी कुडाळ बसस्थानक ते रेल्वे स्टेशन नवीन बसफेरी मंजुर करण्यात आली आहे. तसेच कुडाळ -माणगांव-आंजिवडे अशी गणेशचतुर्थी कालावधीत नवीन बसफेरी वाढविण्यात आल्याचे सांगितले.

पोलीस प्रशासनाकडुन एक गाव-एक पोलीस या योजनेचा प्रसार करण्यात येणार आहे. तसेच पणदूर, कुडाळ, झाराप, माणगांव येथे वाहतुक पोलीस तैनात ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आरोग्य अधिकारी यांनी कुडाळ व कसाल बसस्थानक, कुडाळ व ओरोस रेल्वेस्टेशन येथे आरोग्य पथक तैनात ठेवून चाकरमान्यांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती दिली. तर गणेशोत्सव काळात भारनियमन करण्यात येणार नसल्याची ग्वाही वीज वितरणच्या अधिकार्‍यांनी या बैठकीत दिली. अन्य विविध विभागांच्या नियोजनाचा आढावा घेत सभापती श्री जाधव यांनी आवश्यक सुचना दिल्या.