दहिसरच्या ‘त्या’ बहिणींना तातडीने पोलीस संरक्षण द्या!

सामना प्रतिनिधी, मुंबई

दहिसर येथील दोन बहिणींना तत्काळ पोलीस संरक्षण द्यावे असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. पतीसोबत राहण्यास नकार दिल्याने आपले आईवडील आणि कुटुंबीय आपल्याला ठार मारतील अशी भीती व्यक्त करत तेजल आणि राधा या दोन बहिणींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

तेजल हिने कुटुंबीयांचा विरोध न जुमानता २०१६ मध्ये ब्रिजेश गुप्ता याच्याशी लग्न केले होते. २०१७ मध्ये काहींनी ब्रिजेशचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. त्यात ब्रिजेशचा मृत्यू झाला. यामागे आपल्या कुटुंबीयांचा हात असावा अशी शंका तेजलने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत व्यक्त केली. न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. तीन वर्षांच्या असताना तेजल आणि राधा यांचे त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींशी कुटुंबीयांनी लग्न लावून दिले होते. १८ वर्षांच्या झाल्यानंतर त्यांना सासरी पाठवण्याचे आश्वासन दिले होते, परंतु तत्पूर्वीच तेजलने ब्रिजेशशी लग्न केल्याने कुटुंबीयांनी राधावरही बंधने लादली होती.