सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार – मुख्यमंत्री

सामना प्रतिनिधी । नागपूर/सोलापूर

येत्या डिसेंबरनंतर धनगर समाजाला आरक्षण मिळेल असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे बोलताना दिले. तसेच सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.
मुख्यमंत्री म्हणाले, कुठल्याही समाजाला आरक्षण देण्यासाठी वस्तुनिष्ठ अहवाल केंद्राकडे पाठवणे बंधनकारक आहे. संविधानाच्या तरतुदीत बसणारा हा अहवाल तयार करण्यासाठी राज्य शासनाने टाटा सामाजिक संस्थेची नियुक्ती केली आहे. सध्या अहवाल लेखनाचे काम सुरू आहे. हे काम डिसेंबरअखेर पूर्ण होणे अपेक्षित आहे. यानंतर हा अहवाल मिळताच केंद्राकडे धनगर समाजाला आरक्षण देण्याची शिफारस करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

क्या हुआ तेरा वादा…
मुख्यमंत्री भाषणाला उभे राहताच ‘क्या हुआ तेरा वादा…’ या गाण्याचे रेकॉर्डिंग मेळाव्यात कार्यकर्त्यांनी वाजवले. या गाण्याच्या दरम्यान भाजपने निवडणूक प्रचारादरम्यान त्यांच्याच नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण एक-एक वाक्य ऐकवून करून दिली जात होती. यामुळे मुख्यमंत्री अडचणीत आले. रेकॉर्डिंग थांबल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, दिलेले आश्वासन पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.

लिंगायत समाजाचा विरोध
या निर्णयाने लिंगायत समाजाची मने दुखावली आहेत. सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी यांचे नाव देण्यास अखिल भारतीय शिवा संघटना आणि वीरशैव लिंगायत समाजाने तीक्र विरोध केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर येथील विद्यापीठास अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केल्यानंतर त्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय वीरशैव युवक (शिवा) संघटनेच्या वतीने संभाजीनगरात मुख्यमंत्र्यांच्या पुतळय़ाचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले.