ग्लोबल कोल्हापुरी

मेधा पालकर

रांगडी कोल्हापुरी चप्पल आता कलात्मक कोल्हापुरी होणार आहे. आकर्षक रूप… वाजणारे घुंगरू… देवणे गोंडे… क्या बात है…

ऐटदार, पायात घालताच येणारा करकर आवाज अशी  वैशिष्टय़पूर्ण कोल्हापूरची चप्पल आता ग्लोबल होत आहे.  कोल्हापुरी चपलेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान आणि मान मिळवून देण्याचा महाराष्ट्र राज्य वादी आणि ग्रामोद्योग मंडळ प्रयत्न करणार आहे. पारंपरिक आणि मूळ सौंदर्याला हात न लावता तिचा ‘मेकओव्हर’ केला जणार आहे. त्यानंतर बाजारपेठांमध्ये ‘कलात्मक कोल्हापुरी’ या ब्रँडने तिची विक्री केली जाणार आहे.

वादी आणि ग्रामोद्योग मंडळाने कोल्हापूरच्या कारागीरांसाठी वास कार्यशाळेचे आयोजन केले आहे. त्यात पॅरिसमधील डिझायनर नेओना स्काने या मार्गदर्शन करतील. कोल्हापुरी चपलेला आंतरराष्ट्रीय बाजारात स्थान मिळवून देण्यासाठी पहिल्यांदाच अशा प्रकारची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक क्यापारी, कारागीर, तज्ञांसह ’बाटा’ आणि अन्य प्रसिद्ध पादत्राणे कंपन्यांचीही मदत घेतली जाणार आहे. ही कार्यशाळा डिसेंबरमध्ये घेण्यात येणार असल्याचे मंडळाच्या कार्यकारी अधिकारी रिचा बागला यांनी सांगितले.

कोल्हापुरी चपलेने आपले वैशिष्टय़ टिकवून ठेवले असले तरी काळानुरुप या व्यवसायाला फटका बसत असल्याचे दिसते. त्यामागील कारणे या कार्यशाळेतून जाणून घेतली जाणार आहेत. कोल्हापुरी चपलेचे रूप बदलण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. या चपलेला हिंदुस्थान आणि आंतराराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न आहे, असेही बागला यांनी सांगितले. ‘कलात्मक कोल्हापुरी’ या नावाने या चपलेची विक्री करण्यात येणार आहे. या कार्यशाळेचा एक भाग म्हणून डिझायनर स्काने या कोल्हापूरमधील गावागावांत जाऊन कारागीरांच्या भेटी घेतील. त्यांच्याशी संवाद साधून त्यांना चपला तयार करण्याच्या आधुनिक तंत्राबाबत माहिती देण्यात येईल.

 कोल्हापूरच्या कोणत्याही गोष्टीचं वर्णन ‘जगात भारी कोल्हापुरी’ असंच केलं जातं. कोल्हापुरी चप्पलही याला अपवाद नाही. या चपला बनवणाऱया कारागीरांची कला जगभरात पोहोचावी, यासाठी  पुण्याच्या हर्षवर्धन पटवर्धन यांनी पुढाकार घेतला. जवळपास

५५ देशांमध्ये त्यांनी कोल्हापुरी चपलेला पोहोचविले. हे काम करतानाच शेतकऱयांच्या बायकांना कापडी पिशक्या बनवण्याचं काम देऊन त्यांनाही यात सामावून घेतलं आहे. वयाच्या सोळाव्या वर्षापासून कोल्हापुरी चपलेच्या प्रेमात असणाऱया हर्षवर्धननं इंग्लंडला शिक्षण घेत असताना तिथल्या वास्तव्यातही कोल्हापुरी वापरली. त्यानंतर कोल्हापूरला सतत भेट देत कारागीरांशी संपर्क वाढवला. कारागीरांकडून वेगळ्या चपला बनवून त्या मित्रांना भेट देता देता कारागिरांची परिस्थिती त्यांच्यासमोर आली. या कारागिरांना जगभरात व्यासपीठ मिळवून द्यावं या हेतूने त्यानं चॅपर्स हा ब्रँड सुरू केला आणि आज अमेरिका, इंग्लंड, स्पेन, इटली या देशातही कोल्हापुरीला त्यांनी लोकप्रियता मिळवून दिली.