पृथ्वीचा ताप

 [email protected]

 यंदा पाऊस बरा झाला, पण बराच काळ रेंगाळला. परंपरेने हस्त नक्षत्राच्या समाप्तीबरोबर, हत्तीच्या सोंडेतून उडवल्या जाणाऱया फवाऱयासारखा पाऊस हा सरता पाऊस समजला जायचा. त्यानंतरचं चित्रा नक्षत्र निदान भातशेतीसाठी तरी अनुकूल नसायचं. परंतु आता एकूणच ऋतुचक्र वेगाने बदलताना दिसतंय. ऑक्टोबरच्या मध्यात दिवाळी तोंडावर आली तरी गडगडाटी, कडकडाटी पाऊस कोसळतच होता.

आपली पृथ्वी नावाचा एक ग्रह आपल्या ग्रहमालेत तिसऱया स्थानावर आहे. सूर्यमालेतलं हे ‘हॅबिटेबल झोन’ म्हणजे सजीवाच्या वसाहतीला अत्यंत योग्य असं ठिकाण मानलं जातं आणि तसं ते आहेच. विशाल जलसाठा असलेले महासागर आणि भूभागावर जीवसृष्टीला पोषक अशा वनस्पती आणि वातावरण ही अमूल्य देणगी निसर्गाने सर्वच जिवांना न मागता दिली आहे. परंतु त्यातील माणूस नावाच्या प्राण्याने इतर सजीव सृष्टीवर सत्ता गाजवण्याचा हव्यास इतका पराकोटीला नेलाय की, वैज्ञानिक प्रगतीचं द्योतक म्हणून मंगळावर जाण्याचं कौतुक बघायला उद्या आपण आपला सर्वसंपन्न ग्रह शाबूत ठेवणार आहोत की नाही, असा प्रश्न आता उपस्थित झालाय.

एकविसाव्या शतकाची पहिली दोन दशकं संपत आली आहेत. १८ ते २० या शतकात यंत्रयुग, रसायनयुग, अणुयुग, अवकाश युग अशी जी ‘युग’ प्रवर्तक संशोधनं माणसाने केली ती निश्चितच विस्मयकारी आहेत. त्याचे पुरेपूर फायदे मानवजातीने घेतले आहेत. मात्र या ‘प्रगती’चा अतिरेक टाळण्याचा संयम एवढय़ा काळात माणसाला गवसलेला नाही. त्यामुळे आपल्या ग्रहाचं नष्टचर्य आपणच ओढवून घेत आहोत याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही. शेखचिल्लीप्रमाणे आपण बसलेली फांदी उत्साहाने तोडून कोसळण्याची वाट बघतोय का?

विज्ञानाने तंत्रक्रांती निर्माण केली. त्याचप्रमाणे या ‘प्रगती’च्या बऱयावाईट परिणामांचा लेखजोखाही वेळोवेळी मांडला आहे. १९५३ मध्ये लंडन शहरावर प्रदूषणाची ढगफुटी झाल्यावर पाश्चात्त्य देशांना जाग आली, मग वाढत्या जागतिक प्रदूषणाबद्दल चर्चा सुरू झाली. स्वतः भरपूर प्रदूषण करून ओझोनचं (O३) संरक्षक कवच भेदायला कारणीभूत असणारे विकसनशील जगाला उपदेश करू लागले. अखेरीस रिओ दि जनेरो येथे ‘वसुंधरा’ परिषद होऊन सर्वच जगाने वाढत्या प्रदूषणाबाबत काहीतरी ठोस पावलं उचलण्याचा निर्णय झाला. त्यातही ‘कार्बन क्रेडिट’सारख्या पळवाटा होत्याच. ‘तत्त्वतः’ मान्य असलेल्या गोष्टी हितसंबंधांच्या आड येऊ लागल्या की केवळ कागदावरच ठेवायच्या असा एकूणच जागतिक खाक्या असतो. प्रदूषणाचा भस्मासुर उलटतोय हे जाणवूनही त्याला प्रतिबंध करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होताना दिसत नाही. अशा बेफिकीर सर्वंकष सत्ताधीशांना वॉशिंग्टन विद्यापीठातील प्रा. फ्रीर्सन यांनी आरसा दाखवला आहे. पृथ्वीवरील तापमानवाढ आणि ‘ग्रीनहाऊस इफेक्ट’विषयी कितीही प्रवचनं झोडली तरी ते रोखण्याचे प्रयत्न प्रामाणिकपणे होतायत का यावरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. सन २१०० पर्यंत जगाचं तापमान २ ते ४.९ इतक्या अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. कारण पॅरिस परिषदेत ठरविण्यात आलेलं या शतकाअखेरीस पृथ्वीचं तापमान १.५ अंशानीच वाढू देण्याचं उद्दिष्ट असफल होताना दिसतंय. या संशोधकाच्या मते एकदा आपला ताबा सुटला आणि तापमान अवाच्या सवा वाढू लागलं की समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल. अनेक ठिकाणची हिरवाई नष्ट होऊन वाळवंटं निर्माण होतील. मूक जीव अस्तंगत होऊ लागतील. माणसाचं जिणं दुष्कर होईल. निसर्ग इशारे देतो आहे… पण स्वार्थात आत्ममग्न असलेल्या माणसाला त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ कुठे आहे. निसर्ग मात्र निर्हेतुकपणे त्याचं काम करणारच… ते अरिष्ट असेल तर आतापासून इष्ट उपाययोजना केली पाहिजे.