शाही पेहरावाची हौस वधूला महाग पडणार?

सामना ऑनलाईन । कोलोंबो

लग्न म्हणजे नटण्याची, मुरडण्याची आणि मिरवायची पर्वणीच. त्यात सगळ्यांचा आवडता विषय म्हणजे वधूचा पेहराव. अशीच एक नववधू तिच्या या पेहरावामुळे अडचणीत आली आहे. श्रीलंकेच्या कॅण्डी शहरात पार पडलेल्या या शाही विवाह सोहळ्यात वधूची भली मोठी आणि लांब साडी सावरण्यासाठी जवळपास २५० शाळकरी मुलांचा वापर करण्यात आला. याप्रकरणी श्रीलंकेतल्या राष्ट्रीय बाल संरक्षण प्राधिकरणाने (एनसीपीए) चौकशीचे आदेश दिले आहेत.

श्रीलंकेच्या कॅण्डी शहरात हा शाही विवाह सोहळा रंगला होता. यामध्ये वधूने तब्बल दोन मैल म्हणजेच ३.२ किमी लांबीची साडी नेसली होती. शहरातील मुख्य रस्त्यावरुन हे दाम्पत्य चालत जात होते. त्यावेळी वधूची साडी सांभाळण्यासाठी सरकारी शाळेतील तब्बल २५० विद्यार्थ्यांना ट्रेनसारखे उभे करण्यात आले होते. तसेच विवाह सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांना फुलं देण्यासाठीही १०० विद्यार्थ्यांचा वापर करण्यात आला होता.

शाळेच्या वेळेत एका लग्नाच्या सोहळ्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर करणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे या प्रकरणातील तथ्य जाणून घेऊन दोषींवर कारवाई करणार असल्याची माहिती श्रीलंकेतल्या राष्ट्रीय बाल संरक्षण प्राधिकरणाने (एनसीपीए) दिली.

shrilanka-wedding-1