चिलटांचे आक्रमण; रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांवर हल्ला!

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

डास निर्मूलनाबाबत कुठलीच कारवाई होत नसल्याने अख्ख्या शहरावर डासांचे राज्य आहे. त्यात आता भरीस भर म्हणून चिलटांनी शहरावर आक्रमण केले आहे. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरून ये-जा करणारे पादचारी आणि वाहनधारकांवर जोरदारपणे हल्ला सुरू असल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. प्रशासनाने हे आक्रमण परतवून न लावल्यास संपूर्ण शहरावर या चिलटांचे राज्य येण्याची शक्यता आहे.

सर्वसामान्यांना रोटी कपडा मकान देताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे कामही सरकारला करावे लागते. असे असले तरी सरकारचे अधिकारी मात्र बेफिकीर असल्याने अनेक राज्यात आरोग्याच्या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. यामध्ये डासाचा प्रश्नही संवेदनशील आहे. प्रत्येक शहरासाठी डास निर्मूलनासाठी कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी संबंधित विभागावर आहे. शहराच्या ठिकाणी मनपाची जबाबदारीही महत्वाची आहे, मात्र डेंग्यू, स्वाईन फ्लूसारख्या जीवघेण्या आजारांचा फैलाव झाल्यानंतरच डास निर्मूलनासंदर्भात कारवाई केली जाते. ही कारवाईही थातुरमातुर असल्याने शहरावर वर्षानुवर्षापासून डासांचे राज्य आहे. यात आता चिलटांनी शहरावर आक्रमण केले आहे.

शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावर सध्या चिलटांची झुंड ये-जा करणाऱ्या वाहनधारकांवर आणि पादचाऱ्यांवर जबरदस्त हल्ला करीत आहे. हा हल्ला झाल्यानंतर वाहनधारकांना वाहने चालविणे अशक्य होते. विशेष म्हणजे हेल्मेट असतानाही चिलटे वाट काढीत थेट तोंड, डोळ्यापर्यंत पोहचतात. हा हल्ला झाल्यानंतर तासन्तास वाहनधारक तसेच पादचाऱ्यांना डोळे चोळत थांबावे लागते. त्यामुळे डोळ्यांची आग होण्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागतो.

दरवर्षी शहरात ही समस्या उद्भवत असताना प्रशासनाकडून मात्र यावर उपाययोजना केल्या जात नाही. सध्या या चिलटांचा मोठ्या प्रमाणावर वाहनधारकांना त्रास सुरू असताना त्याबाबत कुठलीच उपाययोजना सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता चिलटांच्या हल्ल्यापासुन बचाव कसा करायचा, असा प्रश्न वाहनधारकांसमोर उभा आहे.