भाजपचे बंडखोर प्रदेशाध्यक्षांवर नाराज, तेंडूलकरांना हटवण्याची मागणी

2

सामना प्रतिनिधी । पणजी

काँग्रेसच्या दोन आमदारांना भाजप मध्ये घेतल्यापासून पक्षात अंतर्गत कलह विकोपास गेला आहे. भाजपच्या गाभा समितीमध्ये उभी फुट पडली आहे. गुरूवारी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या गटाने प्रदेशाध्यक्ष पदावरुन विनय तेंडुलकर यांना हटवावे अशी मागणी केल्यामुळे भाजप समोर धर्म संकट निर्माण झाले आहे.

प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी पक्षाच्या हितासाठी प्रदेशाध्यक्षपद सोडावे आणि गोव्यात भाजप पक्ष संघटनेची फेररचना केली जावी, अशा मागण्या भाजपच्या नाराज माजी मंत्री व माजी आमदारांच्या आज झालेल्या बैठकीत करण्यात आल्या. माजी मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या म्हापसा येथील निवासस्थानी ही बैठक पार पडली. डिसोझा यांच्यासह माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, महादेव नाईक व माजी सभापती अनंत शेट यांनी बैठकीत भाग घेतला.

बैठकीनंतर पार्सेकर यांनी  तेंडुलकर हे कसे अकार्यक्षम आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून अपात्र आहेत याचा पाढा वाचला. पार्सेकर म्हणाले, तेंडुलकर यांच्या कार्यपद्धतीवर सगळे नेते, कार्यकर्ते नाराज आहेत. सर्व मतदारसंघांमधून अशीच माहिती मिळत आहे. तेंडुलकर जेवढ्या लवकर पद सोडतील तेवढे पक्षासाठी ते हिताचे ठरेल.

पार्सेकर म्हणाले, की “आम्ही पुन्हा एकत्र येऊ. सध्या दिवाळी असल्याने काहीजण बैठकीला पोहचू शकले नाहीत. तेंडुलकर यांनी राजीनामा द्यावा ही एकमुखी मागणी आहे. आम्ही बंडखोर नव्हे. जे दोघे नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आले ते बंडखोर आहेत. आम्ही भाजपाच्या हिताच्यादृष्टीने बोलत आहोत. पक्षात संघटनात्मक बदल व्हायला हवेत. तेंडुलकर यांच्याकडेच जर नेतृत्व राहिले तर पक्ष अधिक कमकुवत होईल.”

शिरोड्यात भाजपला फटका बसणार?

शिरोड्याच्या पोटनिवडणुकीवेळी भाजप उमेदवाराचा पराभव करू. आमचा तो निर्धारच आहे, असे महादेव नाईक यांनी सांगितल्या मुळे भाजपची डोकेदुखी आणखीच वाढली आहे. तुम्ही पक्ष सोडणार काय किंवा तुम्ही निवडणूक रिंगणात उतरणार काय असे विचारले असता, या प्रश्नांना योग्यवेळी उत्तर देईन, असे  नाईक यांनी सांगितले.

कार्यकर्त्याचा विश्वासघात झालेला आहे व त्यामुळे आम्ही भाजप उमेदवाराला शिरोड्यात जिंकू देणार नाही असा पवित्रा नाईक घेतला आहे. पक्षाने सरकारची स्थिती नियंत्रणात आणण्याची गरज आहे, असे माजी मंत्री मांद्रेकर म्हणाले.