तेजपालवर २८ सप्टेंबरला आरोप निश्चित होणार

सामना ऑनलाईन । पणजी

महिला सहकाऱ्याच्या लैंगिक शोषणप्रकरणात तरुण तेजपाल विरोधात २८ सप्टेंबर रोजी आरोप निश्चित करणार असल्याचे गोवा येथील न्यायालयाने जाहीर केले. आरोप निश्चित झाल्यावर तेजपाल विरोधात खटला चालवला जाईल.

नोव्हेंबर २०१३ मध्ये गोवा येथील बांबोळीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये महिला सहकाऱ्याचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप तरुण तेजपालवर झाला होता. याप्रकरणी तरुण तेजपालला अटक झाली. प्रकरण उघडकीस येताच तरुण तेजपालला ‘तहलका’ मासिकाचे संपादकपद सोडावे लागले होते. याप्रकरणात पोलिसांनी तेजपालविरोधात ६८४ पानी आरोपपत्र दाखल केले होते. भारतीय दंड विधान संहितेतील कलम ३५४, ३५४ अ (विनयभंग), कलम ३४१, ३४२, कलम ३७६ (बलात्कार), ३७६(२)(एफ) आणि ३७६ (२)(के) (आपल्या पदाचा गैरवापर करीत सहकारी महिलेवर बलात्कार करणे) याखाली त्याच्यावर आरोप ठेवण्यात आले होते.

गोव्यातील मापुसा न्यायालयात गुरुवारी इन कॅमेरा सुनावणी झाली. तेजपालविरोधात भारतीय दंड विधान संहितेतील ३५४ अ, ३५४ ब, ३४१, ३४२, ३७२(२)एफ, ३७६(२)के ही कलमे कायम ठेवण्यात आली आहेत. तर ३७६ हे कलम वगळण्यात आले आहे.