परीक्षेच्या हॉल तिकिटावर गणरायाचा फोटो आणि सहीसुद्धा!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बुद्धीचे दैवत असलेल्या गणरायालाच बी. कॉमच्या परीक्षेला बसवण्याचा प्रताप बिहारमधील दरभंग येथील ललित नारायण मिथिला विद्यापीठाने केला आहे. त्या विद्यापीठाने येत्या ९ ऑक्टोबरला सुरू होणाऱ्या बी. कॉम फर्स्ट इयरच्या परीक्षेसाठी एका विद्यार्थ्याला दिलेल्या हॉल तिकिटावर त्या विद्यार्थ्याच्या फोटोच्या जागी गणरायाचे छायाचित्र छापले आहे. इतकेच नव्हे तर त्या हॉल तिकिटावर परीक्षार्थी म्हणून गणरायांनी स्वाक्षरीही केलेली आहे.

ललित नारायण मिथिला विद्यापीठाच्या या सावळ्य़ागोंधळामुळे बिहारमधील ‘भगवान भरोसे’ शिक्षण व्यवस्थेची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली आहेत. आपल्या हॉल तिकिटावर गणरायाचे छायाचित्र छापले गेल्यामुळे आता आपल्याला परीक्षेला बसू दिले जाईल काय याची भ्रांत कृष्णकुमार रॉय या विद्यार्थ्याला पडली आहे. आपल्या हॉल तिकिटावरील चूक विद्यापीठाने त्वरित सुधारावी यासाठी त्याची धावाधाव सुरू आहे. तो जे. एन. कॉलेजचा विद्यार्थी आहे.