गोल्ड कॉईन

नाश्त्याला काहीतरी कुरकुरीत, चटपटीत खायला कुणाला नाही आवडणार. अशीच एक नाश्याची यम्मी डिश आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही डिश हल्ली लग्नात स्टार्टर किंवा सायडर म्हणून ठेवतात. करायल एकदम सोप्पी आणि खायला चमचमीत अशी गोल्ड कॉईन

साहित्य –  ब्रेड, शिजवलेले बटाटे, मटार आणि अमेरिकन कॉर्न, बारिक चिरलेलं गाजर, बारिक चिरलेली सिमला मिरची व कोथिंबीर, तीळ, सोया सॉस, रेड चिली सॉस, मीठ, तेल.

कृती – एका बाऊलमध्ये शिजवलेला बटाटा कुस्करुन घ्या. त्यात शिजवलेले मटार, कॉर्न, बारिक चिरलेलं गाजर, बारिक चिरलेली सिमला मिरची व कोथिंबीर घाला. सोया सॉस, चिली सॉस, मीठ टाका. सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करुन घ्या. बाटलीचे मध्यम आकाराचे झाकण ब्रेडवर ठेवून ब्रेडचे गोल तुकडे करुन घ्या. एका ब्रेडचे चार गोल तुकडे करा. प्रत्येक तुकडय़ावर थोडे मिश्रण लावा व वरुन तीळ पसरवा. तीळ आवडीनुसार कमी जास्त लावू शकता. नंतर कढईत तेल गरम करुन खरपूस तळून घ्या. डिप फ्राय आवडत नसल्यास तव्यावर शॅलो फ्राय देखील करु शकता. सर्व्ह करताना हिरवी चटणी किंवा शेजवॉन सॉस सोबत सर्व्ह करा.

टिप – तळून झाल्यावर आवडत असल्यास वरुन चीझ किसून देखील देऊ शकता. किंवा भाजीच्या मध्ये छोटा चीझचा तुकडा ठेवून पुन्हा वरुन भाजी लावून देखील बनवू शकता.

ब्रेड वाया जाऊ नये असे वाटत असल्यास एका ब्रेडचे चार चौकोनी तुकडे करुन देखील ही डिश बनवता येते.