गोल्ड…पण चकाकतं ते सोनं नसतं…

वैष्णवी कानविंदे-पिंगे

15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन… या दिवशी हिंदुस्थानातल्या आणि समस्त जगातल्या हिंदुस्थानीयांचं मन आणि व्हॉट्सऍप देशाबद्दलचं प्रेम, विचार, आपुलकी वगैरे गोष्टींनी मन व्यापलं असतं (म्हणजे देशाबद्दलची कळकळ प्रत्येकाच्या मनात असतेच, पण या दिवशी ती अधिक प्रखरतेने वर येते.). त्यामुळे या मानसिकतेचा फायदा करून घेण्यासाठी सिनेमावाले तर सज्ज असणारच. देशप्रेम अधिक या दिवसाची घवघवीत सुट्टी. मग या दिवशी खुशखुशीत सिनेमा आला की बॉक्स ऑफिसवर डोळे बांधून यशस्वी ठरणार हे त्रैराशिक कुणी नव्याने सांगायला नको. मग त्याच सज्जतेत देशप्रेमाबद्दल आजवर प्रत्येक कानाकोपऱयातल्या विषयांवर सिनेमे करणाऱया अक्षयकुमारला घेऊन ‘गोल्ड’ आला आणि प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोचली होती…पण सुपरस्टार अक्षयकुमार, देशप्रेमाने ओतप्रोत भरलेला विषय, त्यात हॉकीसारख्या खेळाची पार्श्वभूमी, शिवाय चकचकीत हाताळणी, जुन्या काळाची गंमत असं अपेक्षांना भारावणारं सगळं खच्चून भरलं असतानाही हा सिनेमा पाहिल्यावर मात्र अपेक्षाभंगच पदरी पडतो आणि हा चकचकीत सिनेमा बघून बाहेर पडताना चकाकतं ते सगळंच सोनं नसतं या वाप्रचाराची महती पटायला लागते.

इंग्रजांच्या काळात हिंदुस्थानी हॉकीपटू ऑलिंपिकमध्ये गोल्ड मेडल तर जिंकतात, पण त्या वेळी इंग्रजी अंमल असल्याने जिंकल्यावर हिंदुस्थानचा झेंडा, राष्ट्रगीत या गोष्टी करता येत नाहीत आणि सच्च्या हिंदुस्थानीयांच्या हृदयात याबाबतीत सल राहतेच. त्यावेळी हॉकी टीमचा मॅनेजर तपन दास ठरवतो की, हिंदुस्थान जेव्हा स्वातंत्र्य होईल त्यानंतर आपली हॉकी टीम पुन्हा ऑलिंपिकमध्ये गोल्ड मेडल मिळवेल आणि जिंकूनही आपल्या देशासाठी न जिंकल्याचं दुखं जे सलतंय ते त्या वेळी आपण धुऊन टाकू… त्याप्रमाणे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक वर्षांनी ऑलिंपिक जाहीर होते. त्या वेळी तपन दास त्यात हिंदुस्थानीय हॉकी टीम उभी करायची ठरवतो. पण अनेक अडचणी येतात… स्वत:च्या मर्यादा, टीमच्या मर्यादा आणि इतर अडचणींना सामोरं जात तो आपली प्रतिज्ञा पूर्ण करतो का? हिंदुस्थानला स्वत:चं गोल्ड मेडल मिळतं का? या प्रश्नांची उत्तरे हा सिनेमा पाहताना मिळतात.

मुळात अक्षयकुमारने आजवर देशासाठीच्या आणि देशावरच्या प्रेमाचे इतके सिनेमे केलेयत की त्याच मुशीतला पुढचा सिनेमा पाहायला मिळणार हे आपल्या डोक्यात सिनेमा पाहायला जायच्या आधीच पक्कं असतं. पण यामुळे त्यातलं नावीन्य मात्र लयास गेल्याचं हा सिनेमा पाहताना प्रकर्षाने जाणवतं. अक्षयकुमार सगळय़ाच सिनेमांमध्ये असंच काहीसं करत आलाय, यात नवीन काय, असं राहून राहून वाटतं आणि इथेच सिनेमा थोडा दुबळा व्हायला सुरुवात होते. अर्थात यातली कथा दणदणीत आहे. हिंदुस्थानने ऑलिंपिकमध्ये मिळवलेलं पहिलं गोल्ड मेडल आणि देशप्रेमाची गाथा असणाऱया या कथेत नक्कीच प्रेक्षकाच्या काळजाला हात घालायची क्षमता आहे. पण नुसती कथा चांगली असून भागत नाही हे ‘गोल्ड’ पहाताना प्रकर्षाने जाणवतं. पटकथा जर विस्कळीत असेल तर सिनेमा बांधलाच जात नाही. ‘गोल्ड’च्या बाबतीतही असंच काहीसं झालंय. त्याची पटकथा चटपटीत असण्याची गरज होती. पण खूप गोष्टी, खूप नाटय़ भरायचं असल्याने ती दिशाहीन झाल्यासारखी वाटते. संवाद काही ठिकाणी टाळय़ा वसूल करणारे झाले आहेत खरे. ‘हमारे घर में इन्कलाब झिंदाबाद पहले होता है और नाश्ता बाद में होता है’ वगैरे डायलॉगना शिटय़ा मारून दाद मिळतेही, पण ती तितक्यापुरतीच.

अभिनयाच्या बाबतीत अक्षयकुमार तर चोख आहेच, पण पुन्हा तेच. त्याच्याच भूमिकेची त्याच्याच पूर्वीच्या भूमिकांशी तुलना व्हायला लागते आणि मग त्या तुलनेत ‘गोल्ड’मधला अक्षयकुमार त्याच्या आधीच्या सिनेमांपेक्षा डावा वाटायला लागतो. त्याने काम चांगलंच केलंय. पण एकूणच व्यक्तिरेखा बांधणी, त्या व्यक्तिरेखेचा समतोल या गोष्टी तितक्याशा जमून आलेल्या नाहीत. त्याचा बंगाली आब अध्येमध्ये घसरतोय असंही जाणवत राहतं. मौनी रॉय ही अभिनेत्री दिसायला बरी आहे. तिचं बंगाली दिसणं, वागणं सगळं साजेसं आहे. पण तिच्या वाटय़ाला फारसं काही आलेलंच नाही. कुणाल कपूर, अमित साद, विनित कुमार या कलाकारांनी मात्र खरंच छान काम केलंय. त्यांच्या भूमिका या सिनेमात आवर्जून लक्षात राहतात. या सिनेमाची गाणी चमकदार असली तरी ती या सिनेमासाठी घातक ठरली आहेत असं म्हणणं अतिशयोक्ती ठरू नये. मुळात अशा सिनेमांना गरज असते एखाद्या उत्फूर्त, देशभक्तीपर गाण्याची. ज्याचे शब्द, धून सगळंच मनावर बिंबेल. पण ‘गोल्ड’ याबाबतीत खूपच कमी पडलाय. आठ गाणी म्हणजे खूप जास्त झाली. या गाण्यांमुळे सिनेमाचा जो गाभा आहे तो विस्कळीत होतो.

अर्थात हा गोल्ड सिनेमा नावाप्रमाणेच चकचकीत आहे. काळदेखील उत्तम उभा केलाय. अभिनय चमकदार आहेच. पण जर तुलना करायची झालीच तर हा सिनेमा ‘चक दे इंडिया’च्या जवळपासही येऊ शकत नाही. त्यात अतिप्रमाणात घातलेला मेलोड्रामा म्हणा किंवा गाण्यांचा भरणा म्हणा, हे सगळंच सिनेमाला घातक ठरलंय. त्यामुळे सिनेमाचा वेग मंदावलाय आणि लांबी वाढलीय. जे टीम बांधणी, मैदानातला खेळ यामध्ये जी उत्कंठता वाढवणारी गंमत असते ती हा सिनेमा पाहताना सापडत नाही. हा खेळावरचा सिनेमा असल्याने शेवट काय असेल हे ठाऊक असतंच. पण या शेवटाकडे जायचा मार्ग कसा आखलाय यात दिग्दर्शकाचं खरं कसब असतं. पण दिग्दर्शिका रिमा कागतीला ती मेख इथे साधता आली नाही. खूप अपेक्षेने सिनेमाघरात गेलेल्या प्रेक्षकांना नाव सोनुबाई असूनही हाती कथलाचा वाळा लागल्याची भावना आली तर नवल वाटायला नको.

दर्जा          :                          **

सिनेमा      :                           गोल्ड

निर्माता      :                           रितेश सिधवानी, फरहान अख्तर

दिग्दर्शक   :                           रिमा कागती

कथा         :                           रिमा कागती, राजेश देवराज

पटकथा     :                           राजेश देवराज

संवाद       :                           जावेद अख्तर

छायांकन :                           अल्वारो गुटारेझ

संगीत       :                           सचिन-जिगर

कलाकार   :                           अक्षय कुमार, मौनी रॉय,  कुणाल कपूर, अमित साद, विनित कुमार सिंग