पुन्हा एकदा जेएनपीटी परिसरातून कोट्यावधी रूपये किंमतीचे सोने पकडले

सामना प्रतिनिधी । न्हावा-शेवा

जेएनपीटीतून तस्करी करून आणलेले १५ किलो सोने पकडल्याची घटना ताजी असतानाच आज बुधवारी पुन्हा एकदा तशाच प्रकारे तस्करी करून आणलेले आणखी १५ किलो सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले आहे. या प्रकारामुळे जेएनपीटी पुन्हा एकदा तस्करीचा अड्डा ठरू पहात आहे, हे सिध्द होत आहे.

२९ डिसेंबरला उरण तालुक्यातील जीडीएल गोदामातून एसीच्या यंत्रामध्ये लपवून आणलेले १५ किलो सोने कस्टमच्या अधिकाऱ्यांनी पकडले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा उरण तालुक्यातील कोप्रोली गावाजवळील ग्लोबिकॉन लॉजिस्टिक या गोदामात १५ किलो सोने पकडण्यात आले आहे. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. विशेष म्हणजे जेएनपीटीतून स्कॅन करून हे कंटेनर आणण्यात आले होते. त्या स्कॅनिंग मध्ये हे सोने आढळले नव्हते. मॅन लॉजिस्टिक या सीएचए एजंटने हे दोन्ही कंटेनर आयात केले होते. आणि ते इथपर्यंत आणले होते. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कस्टम कडून मालाची तपासणी सुरू होती. १५ खोक्यामध्ये १५ किलो सोने सापडले असल्याची माहिती गोदामातील कामगारांकडून देण्यात आली. मात्र अद्याप असे बरेच खोके तपासायाचे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.

चार दिवसात दोन सोने तस्करीच्या घटना घडल्याने पुन्हा एकदा जेएनपीटी आणि सीमाशुल्क विभागाचा गलथानपणा चव्हाट्यावर आला आहे. कंटेनर स्कॅन होवून सुद्धा सोने दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच नुकतेच पकडलेल्या ग्लोबिकॉन लॉजिस्टिक मध्ये १ जानेवारीपासून येथे माल चढउतार करणाऱ्या कामगारांना कंपनी बाहेर काढले आहे. त्यामुळे यामध्ये संशयाचे जाळे ग्लोबिकॉनच्या अधिकाऱ्यांवर देखील जाते. तसेच या कंपनीतील अधिकाऱ्यांचे यापूर्वी रक्त चंदन व एलसीडी टिव्ही तस्करी प्रकरणातही नाव घेतले जात होते. त्यामुळे संशयाची सुई अधिकाऱ्यांकडे वळत आहे. या बाबत सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. त्यांनी पोलिसांना आणि आयबीच्या अधिकाऱ्यांनाही या मालाजवळ फिरकू दिले नाही.