दुबईहून गोव्यात आलेल्या महिलेकडून 18 लाखांचे सोने जप्त

2

सामना प्रतिनिधी । पणजी

दाबोळी विमानतळावर सोमवारी पहाटे दुबईहून आलेल्या एअर इंडिया विमानातील एका महिला प्रवाशाकडून कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी 18 लाख 8 हजार रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले. या महिलेने तस्करीचे सोने पेस्ट पद्धतीने एका पाकिटात आपल्या कमरेला बांधून आणल्याचे उघड झाले. तिला ताब्यात घेऊन कस्टम कायद्यांतर्गत सोने जप्त केले.

दाबोळी विमानतळावर येणार असलेल्या एका आंतरराष्ट्रीय विमानातून तस्करीचे सोने येणार असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळताच त्यांनी सापळा रचला. दुबईहून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या एअर इंडिया (एआय 994) विमानातील प्रवाशांची येथे तपासणी करण्यात येत असताना कस्टम विभागाला एका महिला प्रवाशाच्या हालचालीवर संशय आल्याने तिची येथे तपासणी करण्यात केली.त्यात तिने आपल्या कमरेला एक पाकीट बांधून आणल्याचे आढळले त्यात ‘पेस्ट’ पद्धतीत 590 ग्रॅम सोने असल्याचे उघड झाले. यानंतर कस्टम विभागाने याबाबत त्या महिलेशी कसून तपासणी केली असता हे सोने तस्करीने आणल्याचे स्पष्ट झाले. सदर सोने कस्टम कायद्याखाली जप्त करण्यात आले.

दाबोळी विमानतळावर कस्टम अधिका-यांनी एप्रिल 2018 ते अद्यापपर्यंत अशा आर्थिक वर्षाच्या काळात विविध प्रवाशांकडून एकूण 2 कोटी 36 लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले असल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांनी दिली आहे. याबरोबरच या आर्थिक वर्षाच्या काळात दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिका-यांनी विविध कारवाईत बेकायदेशीररित्या प्रवाशांकडून नेण्यात येत असलेली 67.5 लाख रुपये किंमतीची विविध विदेशी चलनसुद्धा जप्त केली आहेत