‘फेकू’ मुलंच हुश्शार असतात! टोरंटो विद्यापीठातील संशोधकाचा अजब दावा

कधीही खोटे बोलू नये, सगळय़ांशी प्रामाणिकपणे वागावे, मोठय़ांचे नेहमी ऐकावे, असे संस्कार लहानपणापासूनच मुलांवर केले जातात. टोरंटो विद्यापीठातील संशोधकाने मात्र अजब दावा केला आहे. लहानपणी खोटे बोलणारी मुले ही स्मार्ट आणि इंटेलिजन्ट असतात, असा दावा त्याने केला आहे.

लहानपणी खोटे बोलणे ही समस्या नसून अशी मुले भविष्यात स्मार्ट बनतात. एखादी गोष्ट समजण्याची त्यांनी क्षमता उत्तम असते, असा दावा टोरंटो विद्यापीठातील संशोधक कॅग ली यांनी केला आहे. मात्र, लहानपणी खोटे बोलणे आणि मोठेपणी खोटे बोलणे यात फरक असल्याचे त्यांनी सांगितले.

खोटे बोलण्यासाठी वस्तुस्थितीचा अंदाज घेऊन पचेल रुचेल अशी थाप मारावी  लागते. त्यासाठी प्लॅनिंग, टायमिंगही लागते. लहान मुले कमीअधिक प्रमाणात खोटे बोलतात. त्यात काही वाईट नाही. तसे बोलणे समाजविघातक नसते. मात्र, लहानपणाची ही सवय मोठेपणीही कायम राहिली तर ती घातक ठरू शकते- डॉ. शुभांगी पारकर, मनोचिकित्सा विभागप्रमुख, केईएम हॉस्पिटल

चीनमध्ये बालवाडीतील 3 वर्षांपर्यंतच्या 42 मुलांची दोन गटात विभागणी करण्यात आली. एका गटातील मुलांना खेळणे लपवण्यासाठी आणि ते कुठे आहे ते कळू नये म्हणून खोटे बोलण्याच्या टीप्स देण्यात आल्या. दुसऱया गटाला कोणत्याही टीप्स देण्यात आल्या नाहीत. त्यानंतरच्या चाचणीत लपवाछपवी आणि खोटे बोलण्याच्या टीप्स देण्यात आलेला गट जिंकला.