मराठी तरुणांसाठी चांगली संधी


मनीषा सावंत,[email protected]

सध्या उबर, ओला टॅक्सीजनी आपले हातपाय देशभर पसरवले आहेत. मग मराठी माणसानेही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी या टॅक्सीजच्या जाळ्यात पाय रोवून उभं राहायला काय हरकत आहे…

मराठी माणूस म्हटला की त्याला कुणी ‘अरे’ म्हटलेले आवडत नाही. त्याला एकूणच डोक्यावर बॉस आवडत नाही. पण आपल्या मर्जीचे आपण मालक होऊन उबर टॅक्सीचे ड्रायव्हर म्हणून स्वतःचा व्यवसाय त्यांना सुरू करता येईल. कारण यात कोणत्याही वेळी गाडी चालवायची सुविधा असते. प्रवाशाने प्रवास वाढवला तर भाडेही वाढत जाणारे असते. यामुळे यात कोठेही टॅक्सी ड्रायव्हर फसवला जाण्याची शक्यताच उरत नाही. जगातील सर्वात  मोठी राइड शेअरिंग कंपनी असलेल्या उबरने हिंदुस्थान व दक्षिण आशिया प्रांतामधील १ अब्जाहून जास्त राइड्ससह सुवर्ण टप्पा गाठला आहे. फक्त पाचच वर्षांपूर्वी उबरने बंगळुरूमधून हिंदुस्थानात आपली सेवा सुरू केली आणि आता त्याच बंगळुरू शहरात कंपनीने अब्जावधीचा टप्पा गाठणारी ट्रिप घेतली.

ऍप वाहनचालकांच्या सोयीचे…

उबर कंपनीने तयार केलेले मोबाईल ऍप हे फक्त त्यांच्या वाहनचालकांना उपयोगी ठरेल असेच आहे. या ऍपच्या साथीने ड्रायव्हिंग करायला सुरुवात कराल तर इंटरनेटद्वारे उबर कंपनी प्रत्येक वळणावर सोबत असेल. एकदा ऑनलाइन व्हाल तेव्हा तुमच्या क्षेत्रातील ट्रीप्स तुम्हाला दिल्या जातात. फोन बीप वाजवतो. स्क्रीन चमकू लागते. मग त्या स्वीकारायच्या की नाही हेही ड्रायव्हरवरच अवलंबून असते. स्वीकारलेत तर ऍप तुमचा प्रवासी नेमका कुठे उभा आहे त्याचे नेव्हीगेशन सेंड करते. तुम्ही नेमके कोठे आहात त्याची माहिती ऍप त्या ग्राहकालाही देतच असते. प्रत्येक प्रवासानंतर आपली या प्रवासाची कमाई आणि दिवसभरातील आजची एकूण कमाई किती झाली ते वाहनचालकाला दाखवले जाते. ही रक्कम लगेचच त्याच्या बँक खात्यावर ट्रान्सफर केली जाते.

अतिशय सोपा व्यवसाय

 सर्वप्रथम ऑनलाइन नोंदणी करा. त्यावेळी आपल्याबद्दल आणि आपल्या कारची माहिती द्यावी लागते. कोणत्या शहरात ड्रायव्हिंग करायला आवडेल तेही नोंदावे लागते.

 त्यानंतर काही कागदपत्रे सादर करावी लागतात. यात तुमचे लायसन्स, रजिस्ट्रेशन, परमिट, इन्शूरन्सचा पुरावा आणि आणखी काही कागदपत्रे द्यावी लागतात.

सर्व योग्य तऱहेने पार पडले की उबेरचे ड्रायव्हर म्हणून तुम्हाला मान्यता दिली जाते. मग उबरचे ऍप घेऊन प्रत्येक क्षणी उबेरशी कनेक्ट राहाता येते.

स्वतःची कार नसेल तरीही उबेर कंपनी कार उपलब्ध करून देते. उबेरकडून कार विकत घेता येते. ठरावीक कालावधीसाठी भाडय़ाने घेता येते. नाहीतर केवळ त्यांच्या कारवर ड्रायव्हिंगचे कामही करता येते.