‘भारतरत्नच हवा’ म्हणणाऱ्या ‘धन्नो’ला गुगलची आदरांजली

सामना ऑनलाईन । मुंबई

चेहरा चांगला नाही म्हणून आईवडिलांनी नाकारलेली मुलगी ‘धन्नो’ पुढे जाऊन हिंदुस्थानची मान उंचावणारी कत्थक नृत्यांगना बनली अशा सितारा देवी यांची आज जन्मजयंती. त्यांच्या जन्मजयंती निमित्त गुगलनं त्यांच्यावर डुडल तयार करून आदरांजली वाहिली आहे. आपलं योगदान सरकारला माहीत नाही. त्यामुळे पद्मभूषण नको, भारतरत्नच हवा, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

स्त्रीला केवळ रुपावरून नाही तर तिच्या कलागुणांमधून ओळखा असा संदेश त्यांनी त्यांच्या जीवनातून समोर मांडला. सितारा देवी यांचा ८ नोव्हेंबर १९२० रोजी कोलकाता येथे झाला. मात्र जन्माच्यावेळी त्यांच्या चेहरा थोडा वाकडा असल्यानं त्यांच्या आईवडिलांनी एका दाईकडे आपली कन्या सोपवली. या दाईनं त्या मुलीचं नाव ‘धन्नो’ ठेवलं. वयाच्या आठव्या वर्षापर्यंत दाईनंच तिचं पालनपोषण केलं. आठव्या वर्षी त्यांचं लग्न ठरलं होतं. तिनं घराकडेच लक्ष द्यावं असं सासरच्या मंडळींचा आग्रह होता. मात्र शाळेत जायचा आग्रह ‘धन्नो’नं धरला आणि त्यांचा विवाह तुटला. अखेर कामछगढच्या शाळेत धन्नोचं नाव नोंदवण्यात आलं. तिथे सत्यवान आणि सावित्रीच्या पौराणिक कथेवर आधारित एका नृत्यनाटिकेत तिनं काम केलं. तिच्या नृत्याची चर्चा सगळीकडे झाली आणि वृत्तपत्रांमध्ये देखील ‘धन्नो नृत्याविष्कारनं सारे चकित’ असं छापून आलं. त्यावेळी तिच्या पालकांना आपली चूक कळली. ते दाईकडून तिला घरी घेऊन आले आणि तिचं नाव सितारा देवी असं ठेवण्यात आलं. सितारा देवी यांच्या बहिणीवर त्यांना नृत्य शिकवण्याची जबाबदारी देण्यात आली. वडिलांच्या आणि बहिणीच्या हाताखाली त्या अधिक प्रवीण झाल्या. वडिलांच्या मित्राच्या थिएटरमध्ये ब्रेक दरम्यान त्या नृत्य सादर करायच्या, त्यामुळे त्यांचे नाव लोकांच्या मनात ठसले. १६ वर्षाच्या सितारा देवी यांचं नृत्य पाहिल्यानंतर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना ‘नृत्य सम्राज्ञी’ असं विशेषण दिलं. नंतर त्यांनी शाळासोडली आणि नृत्यावर लक्ष केंद्रीत केलं. त्यांचा परिवार मुंबईत स्थिरावला. येथेच पंडित बिरजू महाराज आणि शंभु महाराज यांच्याकडून त्यांनी नृत्याचे धडे गिरवले. त्यांनी नृत्याचे शिक्षण देण्याचे कार्य सुरू केले. जगभरात त्यांचे कार्यक्रम गाजू लागले आणि हिंदुस्थानच्या कत्थक नृत्याला ओळख मिळाली.

sitaradevi

कत्थकमध्ये पारंगत असलेल्या सितारा देवी भरतनाट्यम्, बॅले डान्स आणि परदेशी नृत्य देखील शिकल्या. सितारा देवी यांच्या कत्थक नृत्यात बनारस आणि लखनौ घराण्याची छाप पाहायला मिळते.

सितारा देवी यांच्या कतृत्वासाठी त्यांना १९६९मध्ये संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर १९७५मध्ये पद्मश्री किताब मिळाला. १९९४मध्ये त्यांना कालीदास पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यानंतर त्यांना हिंदुस्थान सरकारने पद्मभूषण दिला मात्र माझं कार्य भारत सरकारला माहीत नाही. तेव्हा मला भारतरत्न हवा पद्मभूषण नको असं म्हणत त्यांनी पुरस्कार नाकारला होता.