गुगलचे जॉब सर्च फीचर

<<स्पायडरमॅन>>

गेल्या वर्षी आपल्या डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये घोषित केल्याप्रमाणे गुगलने नुकतेच आपले नवे ‘जॉब सर्च फीचर’ हिंदुस्थानात उपलब्ध करून दिले आहे. नोकरीचा शोध हा इंटरनेटच्या आगमनामुळे अत्यंत सुलभ होत चालला आहे. अगदी प्रत्यक्ष मुलाखतीला न जाता, व्हिडीओ अथवा ऑडिओ कॉन्फरन्सच्या आधारेदेखील मुलाखती घेऊन मोठय़ा कंपन्या आपले उमेदवार निवडीत आहेत. एकुणातच जॉब सर्चच्या उद्योगाला हिंदुस्थानात तरी फार मोठे भविष्य आहे आणि त्याचाच फायदा घ्यायला आता गुगल सरसावली आहे.

हिंदुस्थानात याआधीच बऱ्याच नावाजलेल्या जॉब सर्च इंजिन्सनी आणि कंपन्यांनी बाजारपेठेत घट्ट पाय रोवले आहेत, मात्र आता गुगलच्या आगमनाने त्यांना एका कट्टर प्रतिस्पर्ध्याचा सामना करावा लागणार आहे. गुगलने हे जॉब सर्च फीचरच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले असल्याने फक्त गुगलचे ऍप किंवा क्रोम ब्राऊझर वापरून उमेदवारांना आपल्या मनपसंत क्षेत्रातील नोकरीचा शोध घेता येणार आहे. लोकेशन बेस्ड रिझल्ट्स देणाऱ्या या फीचरमध्ये अलर्ट, सेव्हड आणि जॉब्ज असे तीन पर्याय उपलब्ध असतील.

जॉब्जच्या माध्यमातून तुम्ही हव्या त्या क्षेत्रातील उपलब्ध नोकऱ्यांचा शोध घेऊ शकता. एखादा जॉब आवडल्यास, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या जॉबची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. जर तुम्ही घाईत असाल आणि माहिती घ्यायला वेळ नसेल, तर या जॉबला तुम्ही सेव्ह करू शकता आणि नंतर सेव या पर्यायाद्वारे निवांतपणे नंतर त्याची माहिती वाचू शकता. अलर्टच्या मदतीने तुम्हाला गेल्या १ ते ३ दिवसांपासून ते मागच्या आठवडा, मागचा महिना इथपर्यंतच्या नवीन भरतीसाठी निघालेल्या नोकऱ्यांची माहिती मिळणार आहे. तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील उपलब्ध नोकऱ्या आणि विशिष्ट क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी यांचेदेखील वेगवेगळे अलर्टस मिळण्याची सोय देण्यात आलेली आहे. या फीचरमध्ये लोकेशन, जॉब पोस्टिंगची तारीख, स्किल्स असे विविध फिल्टर्सदेखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.