वेब न्यूज – अॅण्ड्राइड 9 पाय

1

अजूनही बऱयाच जणांना अॅण्ड्रॉइड ओरियोचे अपडेट मिळालेले नसतानाच गुगलने आपली नवी अॅण्ड्रॉइड सिस्टम ‘अॅण्ड्रॉइड 9 पाय’ बाजारात दाखल करून धमाल उडवली आहे. जुन्या अॅण्ड्रॉईड सिस्टमच्या तुलनेत या नव्या ‘अॅण्ड्रॉइड’मध्ये अधिक आधुनिक फिचर्स देण्यात आलेली असून यात आर्टिफिशल इंटेलिजन्सचादेखील समावेश करण्यात आला आहे हे विशेष. सध्या या नव्या ऑपरेटिंग सिस्टमचे बिटा व्हर्जन गुगल पिक्सलसारख्या काही ठरावीक मोबाईल डिव्हायसेससाठीच उपलब्ध करून देण्यात आले असून हळूहळू ते इतर सर्व मोबाईल डिव्हाईसला उपलब्ध करून दिले जाईल. नव्या फिचर्सच्या मदतीने स्मार्टफोनचा वापर अधिक सुलभ आणि आकर्षक बनवणे हा गुगलच्या या नव्या सिस्टममागचा प्रयत्न असणार आहे. या सिस्टमचा नवा अॅप स्विचरदेखील आता आयफोन एक्सप्रमाणे हॉरिझॉण्टल स्क्रोलची सुविधा देणार आहे. नवी ब्राइटनेस फिचरमुळे बॅटरीचे आयुष्य तर वाढणार आहेच, पण सीपीयूच्या कार्यक्षमतेतदेखील वाढ होणार आहे. अॅपचे टाइम लिमिट हे एक अनोखे फिचर यात देण्यात आले आहे. याच्या मदतीने युजर एखाद्या अॅपवर अधिक वेळ खर्च करत असेल तर त्याला तसे लगेच नोटिफिकेशन मिळणार आहे. त्यामुळे टाइम मॅनेजमेंट करणे अत्यंत सुलभ होणार आहे. या जोडीलाच या नव्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये गुगल असिस्टंटची सोय देण्यात आलेली आहे. ज्यामुळे स्मार्टफोनशी प्रत्यक्ष संवाद साधून तो ऑपरेट करणे सुलभ होणार आहे. जुन्या अॅण्ड्रॉइड ओरियोमध्ये असलेले ‘डू नॉट डिस्टर्ब’चे फिचर या नव्या सिस्टममध्येदेखील असणार आहे. मात्र आता त्याला अधिक कार्यक्षम आणि नव्या रूपात सादर करण्यात आले आहे. आता ज्या कॉण्टॅक्टस् स्टार करून सिलेक्ट केलेले असेल तेच लोक पक्त युजरला संपर्क साधू शकतील. इतरांचे फोन, मेसेजेस अथवा नोटिफिकेशनदेखील युजरला डिस्टर्ब करू शकणार नाहीत.