नकोश्या जाहिरातींना आळा घालणार गुगल

सामना ऑनलाईन । मुंबई

इंटरनेट जगतातलं सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलने वेबसाइट्सवर दिसणाऱ्या जाहिरातींसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यापासून गुगल सर्च केलेल्या वेबसाइट्सवर येणाऱ्या नकोशा जाहिरातींना आळा घालणार आहे.

गुगल ही कारवाई तीन भागांमध्ये करणार आहे. गुगलला एखादा विषय शोधत असताना अचानक भलत्याच वेबसाइटला क्लिक होणं, योग्य साइटवर गेल्यानंतरही नकोशा जाहिराती दिसत राहणं आणि चुकीच्या क्लिकमुळे व्हायरस असलेल्या वेबसाइटवर जाणं अशा तक्रारी अनेक युजर्सनी गुगलकडे केल्या होत्या. अशा प्रकारच्या जाहिराती युजर्सना माहिती शोधण्यात अनेक अडथळे आणतात, असं या तक्रारींत नमूद करण्यात आलं होतं. त्यामुळे गुगल या तक्रारींच्या निवारणासाठी ही कारवाई करणार आहे.

यासाठी गुगल आता प्रत्येक वेबसाईटवर जाहिरातींसाठी एक विशिष्ट चौकट देणार असून जर युजरने त्या चौकटीत क्लिक केलं तरच तो संबंधित जाहिरातीच्या वेबसाईटवर जाईल. त्यामुळे युजरला त्याला हवी असलेली माहिती विनाअडथळा शोधण्यात मदत होईल. तसंच व्हायरस, मालवेअर असणाऱ्या वेबसाइट्सनाही आळा बसणार आहे.