सेलिब्रेटीपेक्षा जनतेने दिली विकासकामांना साथ, उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टींचा दणदणीत विजय

120

सामना ऑनलाईन । मुंबई

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात यंदा खरी चुरस महायुतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी आणि काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्यात होती, मात्र सेलिब्रेटीपेक्षा जनतेने विकासकामांना साथ दिल्यामुळे गोपाळ शेट्टी यांनी या मतदारसंघातून मोठय़ा फरकाने विजय मिळवला आहे. तब्बल 6 लाख 88 हजारांपेक्षा जास्त मते मिळवून शेट्टी यांनी काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांच्यावर 4 लाख 53 हजार 194 एवढय़ा मताधिक्याने विजय मिळवला आहे.

काँग्रेसमधून कुणीही या मतदारसंघातून निवडणूक लढवायला तयार नव्हते. ऐनवेळी काँग्रेसने ‘सेलिब्रेटी कार्ड’ वापरून बॉलीवूड गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला येथून संधी दिली. परंतु उर्मिलाला विभागातील समस्यांची जाण नसल्यामुळे ‘सेलिब्रेटी नको, जननेता हवा’ असे म्हणत उत्तर मुंबईतील जनतेने गोपाळ शेट्टींच्या विकासकामांना पसंती दिली.

ही खरी लढाई फिल्मस्टार आणि रोडस्टार यांच्यात होती. रोडस्टारच जिंकणार असे सुरुवातीपासूनच मी सांगत होतो. जनतेने विकासकामांना दिलेली ही साथ आहे. सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. – गोपाळ शेट्टी, खासदार

विभागातील समस्यांची जाण असणारा नेता
नगरसेवक ते खासदार असा 26 वर्षांचा राजकीय अनुभव, विभागातील समस्यांची जाण, सहज उपलब्ध असणारे खासदार, मराठीसह गुजराती आणि मारवाडी समाजातील नागरिकांनी दिलेला पाठिंबा, मालवणीतले अनेक रखडलेले प्रश्न मार्गी लावल्यामुळे मुस्लिम मतदारांनी दिलेली साथ, ही गोपाळ शेट्टी यांच्या विजयाची बलस्थाने आहेत.

निकालापूर्वीच दिली पेढय़ांची ऑर्डर
गोपाळ शेट्टी यांना विजयाचा आत्मविश्वास असल्याने निकालाच्या दोन दिवस आधीच त्यांनी बोरिवलीतील एका मिठाईच्या दुकानाला दोन हजार किलो मिठाईची ऑर्डर दिली होती. निकालाच्या एक दिवस आधीच शेट्टी यांचे पोयसर येथील जनसंपर्क कार्यालय विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजवले होते.

आपली प्रतिक्रिया द्या