मराठा विद्यार्थ्यांसाठीच्या वटहुकुमावर राज्यपालांची मोहोर

43

सामना प्रतिनिधी । मुंबई

वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणातील मराठा विद्यार्थ्यांना दिलेल्या आरक्षणाद्वारे झालेले प्रवेश कायम करण्यासाठी सरकारने काढलेल्या वटहुकुमावर राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी केली. राज्यपालांच्या स्वाक्षरीमुळे मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता सीईटीच्या वेबसाइटवर प्रवेश कायम झाल्याची अधिसूचना कधी झळकतेय या प्रतीक्षेत विद्यार्थी आहेत.

मराठा विद्यार्थ्यांनी आज सलग 14 व्या दिवशी आपले आंदोलन सुरू ठेवले आहे. सरकारने वटहुकूम काढल्यानंतर त्यावर राज्यपालांची स्वाक्षरी कधी होते याकडे या सर्वांचेच लक्ष होते. सोमवारी राज्यपालांनी यावर स्वाक्षरी केल्याने आता वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशातील दोन फेऱयांत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत त्यांना ज्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता ते आता ग्राह्य धरला जाणार आहे.

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे राज्यपालांना पत्र

दरम्यान, अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी होण्यापूर्वी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी राजभवनावर जात राज्यपालांना वटहुकुमावर स्वाक्षरी करू नये, असे पत्र दिले. 50 ते 60 विद्यार्थी यासाठी राजभवनावर जमले होते. मात्र राज्यपालांनी वटहुकुमावर स्वाक्षरी करून मराठा विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या