हिंगोलीत महाआरोग्य शिबीरात सरकारी यंत्रणा भाजपच्या दावणीला 

4

सामना प्रतिनिधी । हिंगोली 

महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असल्याच्या नावाखाली हिंगोलीत आयोजीत महाआरोग्य शिबीरामध्ये जिल्हाधिकार्‍यांसह संपुर्ण शासकीय यंत्रणा भाजपच्या दावणीला बांधल्या गेल्याचे दिसून आले. सरकारी उपक्रम असतांना जणु हे भाजपचेच शिबीर आहे, अशी बॅनरबाजी करण्यात आली होती.

महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना का डावलण्यात आले ? असा सवाल उपस्थित झाला असून 1 लाख रुग्णांची तपासणी झाल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. तर चष्मे व इतर साहित्य घरपोच मिळेल, असे म्हणत जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांचे खासमखास रामेश्वर नाईक व आयोजकांनी गोरगरीबांची बोळवण केली.

हिंगोली येथे आज अटल महाआरोग्य शिबीराचे आयोजन रेल्वेस्थानकाजवळ मैदानात करण्यात आले होते. शिबीरामध्ये वेगवेगळ्या आजारांसाठी कक्षाची उभारणी करुन रुग्णांची तपासणी करण्यात आली. 25 हजाराच्यावर नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शी चित्र पाहिल्यावर दिसून आला. तथापि, 1 लाख रुग्णांनी लाभ घेतल्याचा दावा जलसंपदामंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी तथा शिबीर समन्वयक रामेश्वर नाईक यांनी केल्याचे सरकारी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

गोरगरीब रुग्णांसाठी या शिबीराचा चांगलाच फायदा झाला. तथापि, महाराष्ट्र शासनाच्या शासकीय यंत्रणेचा वापर करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या आयोजनातुन हे शिबीर होत असल्याचे चित्र उभे करण्यात आले. मात्र, सर्वत्र बॅनरबाजी करुन भाजपनेच हे शिबीर घेतल्याचे चित्र रंगविण्यात सत्ताधारी मंडळी यशस्वी झाली. लोकसभा निवडणुकीपुर्वी भाजपच्या प्रचारासाठी झालेल्या या शिबीरात जिल्हाधिकार्‍यांसह जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, इतर अधिकारी, आरोग्य विभाग सहभागी झाले होते. शिबीर शासनाने आयोजीत केले असेल तर जिल्ह्यातील अन्य पक्षाच्या लोकप्रतिनिधींसोबत बैठक का घेतली नाही आणि त्यांना का बोलावले नाही असा प्रश्न सर्वसामान्यांनी विचारला आहे.