सोनग्राफी मशीनची विल्हेवाट लावण्यासाठी समिती गठीत करण्याचे निर्देश

71

सामना प्रतिनिधी । नगर 

जुन्या, निकामी, नादुरुस्त सोनोग्राफी मशिनची विल्हेवाट लावण्याबाबत असलेला संभ्रम शासनाने दूर केला आहे. पीसीपीएनडीटी कायद्यात याबाबत तरतूद नसल्याने अशा  सोनोग्राफी मशिनची विल्हेवाट लावण्यासाठी संबंधित क्षेत्रातील जिल्हा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय आरोग्य अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीने निर्णय  घ्यावा, असे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत.

नगर शहरात सुमारे 15 ते 20 जुन्या, वापरात नसलेल्या सोनोग्राफी मशिन आहेत. तर जिल्ह्यात अशा मनिशची संख्या 150 पर्यंत आहे. या मशिन वापरात नसल्याचे अथवा निकामी  असल्या तरी त्या नष्ट कशा करायच्या, त्याची विल्हेवाट लावायची कशी, याची तरतूद कायद्यात नव्हती. याबाबत सोनोग्राफी मशिन धारकांसह रेडिओलॉजिस्ट संघटना, महापालिक यांच्याकडून शासनाकडे चौकशी केली जात होती. अखेर शासनाने याबाबत निर्णय घेऊन अशा मशिनची विल्हेवाट लावण्याचे अधिकार जिल्हास्तरीय समितीला दिले आहेत. त्यासाठी  संबंधित क्षेत्रातील जिल्हा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाला  देण्यात आल्या आहेत.

या समितीत संबंधित विभागातील उपसंचालक कार्यालयातील सहाय्यक संचालक, सोनोग्राफी केंद्राचे मालक, जिल्हा/महापालिकेशी संबंधित विभागीय/ जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, तांत्रिक क्षेत्रातील अधिकारी आदींचा सदस्य म्हणून समावेश राहणार आहे.

दरम्यान या आदेशामुळे जुन्या सोनोग्राफी मशिनची विल्हेवाट लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच मशिन बंद असल्याचे तसेच वापरात नसल्याचे दाखवून त्या मशिनचा  गैरवापर करण्याच्या प्रकारांनाही या आदेशामुळे आळा बसण्यास मदत होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या