केंद्रीय कर्मचाऱ्यांना घरासाठी सरकार देणार २५ लाखांचे कर्ज

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता नवीन घर बांधणे किंवा खरेदीसाठी ८.५० टक्के व्याजदराने २५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेता येणार आहे. केंद्र सरकारच्या गृहनिर्माण अग्रीम योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांना हे कर्ज मिळणार आहे. यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना ६ ते ९.५० टक्क्यांनी साडेसात लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळत होते, मात्र आता मर्यादा २५ लाखांपर्यंत वाढविली आहे. पूर्वी पती-पत्नी दोघेही केंद्रीय कर्मचारी असल्यास एकालाच घरासाठी कर्ज मिळत होते, मात्र यापुढे दोघांनाही स्वतंत्रपणे गृहकर्ज घेता येणार आहे.

११ लाखांची होणार बचत
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण अग्रीम योजनेचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्याने २० वर्षांसाठी २५ लाखांचे कर्ज घेतल्यास तब्बल ११ लाख रुपयांची बचत होऊ शकेल. इतर बँकांकडून २० वर्षांसाठी ८.३५ टक्के व्याजदराने २५ लाखांचे कर्ज घेतल्यास २१,४५९ रुपये ईएमआय भरावा लागेल. २० वर्षांत ही रक्कम ६० लाख होते. मात्र सरकारच्या योजनेत पहिली १५ वर्षे १३,८९० रुपये आणि पाच वर्षे २६,५४११ रुपये भरावा लागेल. २० वर्षांत ही रक्कम ४० लाख ८४ हजार होते अशी माहिती नगरविकास मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.